Ratnagiri: खेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:56 PM2024-09-18T12:56:08+5:302024-09-18T12:56:27+5:30
खेड (जि. रत्नागिरी ) : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ...
खेड (जि. रत्नागिरी) : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ब्लॅक पँथर कैद झाला आहे.
खेडमधील शीतल पेठे यांच्या चाकाळे येथील शेतघराच्या अंगणात आलेला ब्लॅक पँथर सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. अंगणात एका कुत्र्याला त्याची चाहूल लागल्याने तो जोरजोरात ओरडत असल्याचेही टिपले गेले आहे. या व्हिडीओने मात्र खेड तालुक्यात ब्लॅक पँथर अस्तित्वात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. नष्ट झालेली प्रजात पुन्हा उभारी घेत असल्याचेही यातून पुढे येत आहे.
हा बिबट्या अर्थातच ब्लॅक पँथर बुधवारी (दि. ११) रात्री ९:३६च्या सुमारास कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो भक्ष्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हाही बिबट्याच
बिबट्याच्या कातडीचा रंग त्वचेतील ‘मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरीरावर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात; पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत.
काळा बिबट्या आढळणे, ही बाब तशी दिलासा देणारी आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील जंगलांमध्ये या बिबट्याचे अस्तित्व आहे. मात्र, खेडच्या दृष्टीने ही बाब अतिशय दिलासा देणारी आहे. हा बिबट्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. -सुरेश उपरे, वनाधिकारी, खेड