रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास, मात्र घरातूनच घ्यावी लागणार ब्लँकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 11:57 AM2021-12-01T11:57:19+5:302021-12-01T12:13:46+5:30
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता सुरु झाल्या असली तरी एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांना दिली जाणारी ब्लँकेट्सची सुविधा अजूनही बंदच
सुधीर राणे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता सुरु झाल्या असली तरी एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांना दिली जाणारी ब्लँकेट्सची सुविधा अजूनही बंदच आहे. थंडीच्या दिवसात एसी डब्यात अधिकच थंडी वाजत असल्यामुळे प्रवाशांना प्रवासाला निघताना घरातूनच ब्लँकेट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता थंडीच्या दिवसात तरी ही सुविधा परत सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रशासनाने एसी डब्यांमध्ये पडदे लावणे बंद केले आहेत. तसेच ब्लँकेटची सुविधाही बंद केली आहे. त्यामुळे काही प्रवासी घरुन चादर आणण्यापेक्षा स्टेशनवर विक्री होणारे रेडिमेड डिस्पोजेबल बेडरोल खरेदी करीत आहेत. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, आर्थिक संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पूर्वीप्रमाणे गाड्या पुर्ववत होत आहेत.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे
- मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या, राजधानी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस
- ओखा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस
- नेत्रावती एक्स्प्रेस, जनशताब्दी, एर्नाकुलम, गरीब रथ
थंडीच्या हंगामात कसा करणार प्रवास?
- नोव्हेंबरपासून कोकणासह अनेक जिल्ह्यांत तसेच राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते.
- कोरोनाचा संसर्ग सुरू होण्याआधी रेल्वे प्रशासनाकडून रात्री एसीतून प्रवास करणाऱ्यांसाठी ब्लॅंकेट दिले जात असे.
- आता सर्व गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र ऐन थंडीत ब्लँकेटची सोय सुरू न केल्याने थंडीत प्रवास करताना त्रासाचे होणार आहे.
लवकरच सेवा पूर्ववत होऊ शकते
- कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वेच्या सर्व मार्गांवरील गाड्या अनेक महिने बंद ठेवण्यात आल्या होत्या. संसर्ग कमी होताच विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या.
- विशेष गाड्या आरक्षित असल्याने, त्यांचे तिकीट दरही अधिक असल्याने त्यातील पूर्वीच्या सुविधा दिल्या जात नव्हत्या.
- आता या विशेष गाड्यांचा दर्जा काढून त्या नियमित केल्या आहेत. त्यामुळे बंद केलेली ही सुविधाही लवकरच पूर्ववत होऊ शकते.
एसीतील प्रवाशांना थंडीचा ताप
- पूर्वी रात्री वातानुकूलित डब्यांमध्ये ब्लँकेट दिली जात असेत. सध्या ती दिली जात नसल्याने स्वत:ची ब्लॅंंकेट नसेल तर कुडकुडायला होते, असे आनंद शेजवळ हे प्रवासी सांगतात.
- आता ट्रेनच्या एसी डब्यातून प्रवास करताना ब्लॅंंकेटचे ओझे बाळगावे लागणार आहे; अन्यथा कुडकुडतच आख्खा प्रवास करावा लागेल, असे प्रवासी विमल भाटकर म्हणतात.
- वामन शिंदे यांच्या मते, रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेसह अन्य गाड्यांमध्ये प्रशासनाने आता सर्व सुविधाही सुरू करायला हव्यात.
देशभरातील सर्व रेल्वेमार्गांवरील आगाऊ आरक्षण असलेल्या सर्व विशेष गाड्यांमधील सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. आता या गाड्या नियमित झाल्या असल्या तरी सुविधांबाबत रेल्वे बोर्डाकडून कुठल्याच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे ब्लँकेटबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे, रत्नागिरी