रत्नागिरीतील शेट्येनगरात स्फोट: ..त्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली, प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:18 PM2023-01-20T16:18:41+5:302023-01-20T16:19:00+5:30
स्फाेटाने रत्नागिरी हादरून गेली
रत्नागिरी : सिलिंडरमधून गळती झालेला गॅस, फ्रीज आणि एसीचा काॅम्प्रेसर या सर्वांचा एकत्रित स्फाेट झाल्याने शेट्येनगर येथील स्फाेटाची तीव्रता वाढल्याचा प्राथमिक निष्कर्ष पाेलिसांनी काढला आहे. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे, असेही पाेलिसांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील शेट्येनगर येथे बुधवारी (१८ जानेवारी) पहाटे ४:५५ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या शक्तिशाली स्फाेटाने रत्नागिरी हादरून गेली. बुधवारी पहाटे अश्फाक अहमद काझी (५२) हे रिक्षा धुण्यासाठी जाण्यापूर्वी किचनच्या लाईटचा स्वीच सुरू केला. याचवेळी घरात पसरलेल्या गॅससोबतच फ्रीज, एसीचा कॉम्प्रेसर या तिघांचा एकत्रित स्फोट झाला. कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे फ्रीज उंच उडाला. या स्फाेटाची तीव्रता एवढी हाेती की, स्फोटाने स्लॅबही उडवून दिला.
स्लॅबखाली सापडून पत्नी कनीज अश्फाक काझी (४८) व सासू नुरून्नीसा अब्दुल हमीद अलजी (७०) यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अश्फाक काझी गंभीररीत्या भाजल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांचा मुलगा अम्मार अश्फाक काझी (२०) याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अश्फाक काझी पहाटे उठल्यानंतर किचनमधील लाईट लावल्याने त्यांच्या हाताला विजेचा धक्का बसला. त्यानंतर बाेर्डातून आग येऊन फ्रीज व एसीचा काॅम्प्रेसर यांचा स्फाेट झाला. सिलिंडरमधून गळती झालेला गॅस, फ्रीज आणि एसीचा काॅम्प्रेसर या सर्वांचा एकत्रित स्फाेट झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा पाेलिसांनी निष्कर्ष काढला आहे.
सिलिंडरमधील गॅस खोलीमध्ये पसरल्यानंतर बराच काळ झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढते. सिलिंडरमधील गॅस बाहेर आल्याची कल्पना घरच्या व्यक्तिंना कशी आली नाही? गॅस गळतीमुळे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवला नाही का, असे प्रश्न उपस्थित हाेत आहेत.