‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी, किनारपट्टीवर सुरक्षागार्ड तैनात
By अरुण आडिवरेकर | Published: December 29, 2023 06:40 PM2023-12-29T18:40:51+5:302023-12-29T18:49:23+5:30
किनारपट्टीवर सुरक्षागार्ड नेमले
रत्नागिरी : सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी माेठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल हाेतात. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. वाहतूककोंडी होऊ यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन करताना पाेलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, पर्यटकांनी आनंद लुटावा, कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या काळात जास्तीत जास्त वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. म्हणून ज्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे अशा ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात येणार आहेत. वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरद्वारे वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी काही टोळक्यांद्वारे महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. काही गुन्हे घडतात यासाठी साध्या वेशात महिला व पुरुष पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अतिउत्साहामुळे आणि पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे अनेक तरुण वेगवेळ्या समुद्राच्या पाण्यात उतरतात. त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि एखादी दुर्घटना घडते. हे टाळण्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षागार्ड नेमले आहेत. तेथील ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही कुलकर्णी म्हणाले.