‘लोकमत’ आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आज रक्तदान महाशिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:29+5:302021-07-14T04:36:29+5:30
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत’ने रक्तदान महाशिबिरे राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केली आहेत. याअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत बुधवार, ...
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत’ने रक्तदान महाशिबिरे राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केली आहेत. याअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत बुधवार, दि. १४ रोजी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यावर्षी कोरोना संकटामुळे रक्ताची गरज वाढली आहे. मात्र, लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्याने नियमित होणारे रक्तदानही कमी झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ने संस्थापक-संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा तथा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर दि. २ ते १५ जुलैयादरम्यान रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. जिल्हा रुग्णालयात २ जुलैरोजी आयोजित केलेल्या शिबिराने प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत रत्नागिरी, चिपळूण राजापूर आणि देवरूख या शहरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
बुधवार, दि. १४ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात रत्नागिरीतील संपर्क युनिक फाैंडेशन, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, क्रेडाई, जीवनदान, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स आणि वैश्य युवा, रत्नागिरी या सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. अधिकाधिक दात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
‘लोकमत’ आणि रत्नागिरी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरातही अधिकाधिक दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.