खोटे बोलल्याच्या रागातून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:55 PM2019-03-10T23:55:50+5:302019-03-10T23:55:58+5:30

लांजा : श्वान तेथेच असतानाही चुलती खोटं बोलली याचा राग आल्याने या क्षुल्लकशा कारणावरून व्हेळ सडेवाडी येथील पुतण्याने चुलता ...

The blood of the lie is lying | खोटे बोलल्याच्या रागातून केला खून

खोटे बोलल्याच्या रागातून केला खून

Next

लांजा : श्वान तेथेच असतानाही चुलती खोटं बोलली याचा राग आल्याने या क्षुल्लकशा कारणावरून व्हेळ सडेवाडी येथील पुतण्याने चुलता - चुलतीच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार मारल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. रविवारी पोलिसांनी पुतण्या प्रतीक याला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्हेळ सडेवाडी येथे एकनाथ धकटू शिगम (६०), त्यांची पत्नी वनिता एकनाथ शिगम (५५) व मुलगी तनुजा (१९) असे हे छोटे कुटुंब आनंदाने राहात होते. एकनाथ यांचा चुलत भाऊ चंद्र्रकांत यांचा मुलगा प्रतीक हा व्हेळ येथे गावाला आल्यानंतर प्रतीक व चुलती वनिता यांचे या ना त्या कारणावरून नियमित वाद होत होते. त्यावेळी चुलती वनिता ही रागाने ‘मी तुला बोडशाने मारीन’, अशा म्हणत असे. घरात कोणाचाही धाक नसल्याने प्रतीक हा आपल्या मनात येईल तसा वागत होता. रात्री-अपरात्री दारू पिऊन टेपरेकॉर्डरचा मोठा आवाज करून तो गाणी ऐकत असे.
एकाच घरात त्यांच्या वेगवेगळ्या खोल्या असल्या तरी त्याच्या या वागण्याचा एकनाथ व वनिता यांना नेहमीच त्रास होत होता. घटनेच्या चार दिवसांपूर्वीही टेपरेकॉर्डरच्या मोठ्या आवाजावरून प्रतीक व वनिता यांच्यात वाद झाला होता. प्रतीक सोबत कोणीच नसल्याने तो एकाकी पडल्याने त्याचा दिवसेंदिवस संयम ढळत होता. घरातील चुलता-चुलती बरोबर भांडणे तसेच गावातदेखील त्याचा उपद्र्रव वाढल्याने येथील ग्रामस्थांनीही प्रतीक याच्या वडिलांना तशी समज देऊन आपल्या मुलाला मुंबईत घेऊन जा, अशी विनंती केली होती. मात्र, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलगा गावात आल्यावर तरी सुधारेल, अशी आशा त्याच्या वडिलांना होती. मात्र, चंद्र्रकांत यांच्या आशेवर प्रतीक याने पाणी फेरले होते.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे एकनाथ शिगम हे आपल्या जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी पत्नी वनिता घरी होती तर मुलगी तनुजा ही ओणीतील हॉस्पिटलमध्ये कामाला गेली होती. यावेळी प्रतीक याचा श्वान बाहेर कुठेतरी गेल्याने त्याने चुलती वनिता हिला ‘तू माझ्या श्वानाला पाहिलेस का? असे विचारले. त्यावर वनिता हिने नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर एकनाथ शिगम हे जनावरांना सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान गोठ्यात आणून बांधत असताना प्रतीक याला त्याचा श्वान या जनावरांच्या घोळक्यात दिसला. त्यामुळे त्याने चुलती वनिता हिला श्वान येथेच असताना तू खोटं का बोललीस? असा जाब विचारला. त्यावरुन प्रतीक व वनिता यांच्यात वाद झाला.
चुलती खोटं बोलल्याचा राग आल्याने प्रतीक याने या रागात चुलते एकनाथ यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी शेजारीच असलेल्या वनिता यांनी एकनाथ यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता, प्रतीक याने तिला ढकलून दिल्याने तिच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर संशयित आरोपी पुतण्या प्रतीक याने चुलते एकनाथ यांना जमिनीवर पाडून चार ते पाच वेळा त्यांच्या डोक्यात दगडाने वर्मी घाव घातले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा चुलती वनिता हिच्याकडे वळवला आणि तिच्या डोक्यातदेखील दोन ते तीन दगडाचे वर्मी घाव घातले.
एकनाथ यांच्या घराच्या मागील बाजूला राहणाऱ्या एका ग्रामस्थाला ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्याने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी एकनाथ व त्यांची पत्नी हे दोघेही रक्ताच्या थोरोळ्यात निपचित पडलेले होते. तोपर्यंत प्रतीक हा तेथून पळून गेला होता.
त्यानंतर त्या ग्रामस्थाने वाडीतील अन्य ग्रामस्थांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर प्रतीक याचा शोध घेण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली. तोपर्यंत घटनास्थळापासून प्रतीक हा तीन ते चार किलोमीटर असलेल्या व्हेळ फाटा येथे पोहोचला होता. गावकऱ्यांनी त्याठिकाणी त्याला पकडून बांधून ठेवले होते. यावेळी तो ‘मला सोडा, मला तनुजा हिला मारायचे आहे’, असे ओरडत होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, गुन्हा अन्वेषण विभागाचे शिरीष सासणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
हसते-खेळते कुटुंब झाले उद्ध्वस्त
प्रतीक याने जमीन व घराच्या वादातून हा गुन्हा केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र, चुलती खोटं बोलली या क्षुल्लक कारणावरून प्रतीक याने टोकाचे पाऊल उचलल्याने एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. रविवारी प्रतीक याला पोलिसांनी लांजा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Web Title: The blood of the lie is lying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.