मार्गताम्हाणे येथे तरुणाचा खून?
By Admin | Published: May 11, 2017 11:01 PM2017-05-11T23:01:42+5:302017-05-11T23:01:42+5:30
मार्गताम्हाणे येथे तरुणाचा खून?
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावर मार्गताम्हाणे पॉवर हाऊसजवळ जंगलमय भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह परप्रांतीय तरुणाचा असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मार्गताम्हाणे बोऱ्या फाट्याच्या पुढील भागात असलेल्या पॉवर हाऊसजवळ निर्जनस्थळी खोरा येथे कुंभ्याच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. मृतदेहाच्या अंगावर हिरवट टी-शर्ट व निळी जिन्स पँट व पायात स्पोर्टस् शूज होते. चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक बडेसाहब नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, रामपूर दूरक्षेत्राचे हवालदार उदय भोसले, तडवी, लालजी यादव इतर पुरुष कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतदेहाची पाहणी केली.
मृतदेहाजवळ एक बंद मोबाईल होता. त्याचे हात झाडाला बांधलेले होते व त्याच्या तोंडाला कापड बांधलेले होते. हा तरुण २५ ते ३० वर्षांचा असावा. त्याचा खून करून त्याला तेथे लटकविण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चिपळूणच्या उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृत तरुणाचा बंद मोबाईल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील असावा, असे समजल्याने पोलिसांनी ती शक्यता पडताळून पाहिली; परंतु संबंधित लोकांनी हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे सांगितले. त्यामुळे अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. रात्री उशिरा चिपळूण पोलीस ठाण्यात या खुनाची नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.