तोंडवळी किनारी महाकाय देवमासा मृतावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 06:42 PM2018-03-31T18:42:45+5:302018-03-31T18:42:45+5:30
मालवण - मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवर शनिवारी सकाळी ७ वाजता महाकाय देवमासा (ब्ल्यू व्हेल) मृतावस्थेत आढळून आला. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेत हा देवमासा जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी लावला. दरम्यान, तळाशील किनारी मृतावस्थेत देवमासा लागल्याने मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी एकच गर्दी केली होती.
महाकाय देवमासा मृतावस्थेत आचरा येथील काही मच्छीमाराना शुक्रवारी रात्री समुद्रात वाऱ्याच्या प्रवाहासोबत मालवणच्या दिशेने वाहून जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा मृतावस्थेतील देवमासा मालवणपर्यंतच्या किनाऱ्यावर लागण्याची मच्छीमारांनी शक्यता वर्तवली होती. शनिवारी सकाळी मासेमारीस जाणाऱ्या मच्छीमाराना समुद्र किनारी महाकाय मासा तरंगताना दिसला.
मृतावस्थेतील व्हेल माशाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी सकाळीच सकाळी तळाशील किनारा गाठला. मच्छीमारानी त्या देवमाशाला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्या माशाची विल्हेवाट लावण्यासाठी भला मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी कार्यवाहीसाठी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. हा देवमासा २५ ते ३० फूट लांबीचा असून एखाद्या जहाजाच्या धडकेत जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे मच्छीमारांनी सांगितले.