बोट क्लब लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:07+5:302021-08-18T04:37:07+5:30

रत्नागिरी : प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळेत पर्यटकांना साहसी खेळांचा आनंद लुटता यावा, यासाठी लवकरच गणपतीपुळे बोट क्लब सुरू केला जाणार ...

Boat club soon | बोट क्लब लवकरच

बोट क्लब लवकरच

Next

रत्नागिरी : प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळेत पर्यटकांना साहसी खेळांचा आनंद लुटता यावा, यासाठी लवकरच गणपतीपुळे बोट क्लब सुरू केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बोट क्लबचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन विभागाकडून देण्यात आली. कोकण पर्यटनात नवनवीन कल्पना आणणारे पर्यटन महामंडळाचे सल्लागार डाॅ.सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या बोट क्लबची निर्मिती करण्यात आली आहे.

आपद्ग्रस्तांना मदत

गुहागर : चिपळूण तालुक्यात कळंबस्ते, दळवटणे अशा गावांमध्ये दरडी कोसळून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कुटुंबांना मुंबई-बोरीवलीच्या चोगले हायस्कूलच्या १९७५ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी जीवनावश्यक वस्तूची मदत केली. यामध्ये शशांक नाईक, श्रेयस नाईक, प्रदीप कदम, भरत देवरुखकर यांचा सहभाग होता.

मदतीचा ओघ

चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना विलेपार्ले पूर्वकडून मदत देण्यात आली. शिवसेना शाखा क्र ८५चे प्रमुख अनिल मालप यांच्या साहाय्याने उक्ताड, मिरजोळी, शिरळ, भुवडवाडी, शंकरवाडी, मुरादपूर, तसेच सती-चिंचघरी अशा ठिकाणी वाटप करण्यात आले. यावेळी अशोक गुरव, ओंकार शेंडे, जुईली शेंडे, प्रसाद पेडणेकर उपस्थित होते.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आबलोली : आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यामार्फत व रुग्णकल्याण समिती यांच्या पाठपुराव्याने आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे. तिचा लोकार्पण सोहळा रुग्णकल्याण समिती अध्यक्षा नेत्रा ठाकूर व पंचायत समिती सभापती पूर्वी निमूणकर यांच्या हस्ते झाला.

चिपळूण गॅलेक्सीचा सत्कार

चिपळूण : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीतर्फे चिपळूण व परिसरातील पूरग्रस्त लोकांना मदत करण्यात आली. या सेवाकार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनी अध्यक्षा स्वाती देवळेकर व पदाधिकाऱ्यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम आदी उपस्थित होते.

मतदान केंद्राची मागणी

खेड : तालुक्यातील वाडी जैतापूर, कामिनी व वाडी बेलदारसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे केली. दुर्गम भागात वसलेल्या या गावांना ५ ते १० किलोमीटर पायपीट करून मांडवे व मौजे जैतापूर या मतदान केंद्रावर यावे लागते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही गावे गेली अनेक वर्षे पायपीट करून, आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

जवानांकडून पीपीई किट

खेड : शहरातील डाॅक्टर मागील दीड वर्ष कोविड १९च्या महामारीत अहोरात्र काम करून जनतेवर उपचार करत आहेत. त्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खेड होमगार्ड पथकाच्या वतीने शंभर पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोविड महामारी, पुरस्थिती, दरड कोसळून झालेले अपघात व मनुष्यहानी या प्रसंगी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त करतानाच, समाजाची बांधिलकी म्हणून स्वातंत्र्य दिनी खेड होमगार्डने विशेष उपक्रम राबविला.

Web Title: Boat club soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.