बोटिंग प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतोय
By admin | Published: September 5, 2014 10:40 PM2014-09-05T22:40:49+5:302014-09-05T23:31:07+5:30
जलपर्यटन : मोडकाआगर धरणाने घेतले रोजगार निर्मितीचे नवे रूप
असगोली : अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये असणारा बोटिंग प्रकल्प पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. पावसाळ्यातदेखील या बोटिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहे. या बोटिंग प्रकल्पामुळे गुहागरचा आर्थिक विकास होणार आहे. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणामध्ये बोटिंग प्रकल्पाने पर्यटनामध्ये आपले यशस्वी नाव कोरले आहे. येथे आणखी सोयीसुविधा शासनाने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. २००६ साली दुर्लक्षित असलेल्या मोडका आगर धरणामध्ये गुहागर पर्यटन विकास संस्थेच्या उज्ज्वला रहाटे यांनी धाडसाने बोटिंग प्रकल्प सुरु केला. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणाला बोटिंग प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळाली. येथे मुंबई - पुणे तसेच परदेशी पर्यटकांची ये-जा सुरु झाली. तालुका व जिल्ह्यातील पर्यटनप्रेमी आपल्या कुटुंबासमवेत निसर्गाच्या सौंदर्याची मजा लुटण्याबरोबर जल पर्यटनाची मजा घेऊ लागले.
गुहागर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत व समुद्र किनारी वसलेल्या अतिशय सुंदर गावाला देखणा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावर मिळणारे शंखशिंपले, समुद्रस्थान, डोलणाऱ्या नारळी - पोफळीच्या बागा, पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिरे, शिवरायांचा गोपाळगड अशा अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडणाऱ्या आहेत. त्यामुळे बोटिंग प्रकल्पामुळे आणखीनच भर पडली आहे. परंतु तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अजूनही येथे काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामध्ये धरणावरील असलेल्या बेटावर जंगल सफर, रॅपलिंग, निसर्गाेपचार केंद्र, लेक क्रॉसिंग प्रदूषणविरहीत साहसी व करमणूक खेळांचा नियोजनबद्ध विकास, सुसज्ज गार्डन, अल्पोपाहार आदी महत्त्वाच्या गोष्टींमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या तेथे लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळांचे साहित्य उपलब्ध आहे. त्याचा आनंद लहान मुले घेताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गुहागर तालुक्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. यामुळे वर्षभर पर्यटकांची मांदियाळी असते. गुहागरात जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन करणे महत्त्वाचे असून, या उपक्रमांमुळे अधिक पर्यटक गुहागरला येतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)