गणपतीपुळेच्या समुद्रात बोटिंग कामगाराचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 19:04 IST2023-01-06T19:03:40+5:302023-01-06T19:04:10+5:30
गणपतीपुळे : पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या बोटिंग वरील कामगाराला आकडी येऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना ५ जानेवारी रोजी सायंकाळी ...

गणपतीपुळेच्या समुद्रात बोटिंग कामगाराचा बुडून मृत्यू
गणपतीपुळे : पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या बोटिंग वरील कामगाराला आकडी येऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) घडली. संजय विठ्ठल कुर्टे (४८, रा. वरची निवेंडी, पातेवाडी, रत्नागिरी) असे नाव आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनारी व्यावसायिक बोट मालकांकडे संजय विठ्ठल कुर्टे काम करत होते. त्यांना एक वर्षापासून आकडी येण्याचा प्रकार सुरु होता. गुरुवारी सायंकाळी ते लाईफ जॅकेट घालून समुद्रामध्ये आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना त्यांना आकडी आली व ते पाण्यामध्ये बुडायला लागले.
यावेळी गणपतीपुळे समुद्रावर असणारे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव, प्रशांत लोहाळकर यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तत्काळ देवस्थानच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी मालगुंड आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वालिया यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जयगड पोलिस स्थानकाचे निरीक्षक जयदीप खळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव व पोलिस नाईक प्रशांत होळकर करत आहेत.