परजिल्ह्यातील बोटींचा परतीचा भोंगा वाजला, रत्नागिरी किनारपट्टी सुरक्षित, तामिळनाडूच्या ३० नौका थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:28 PM2017-12-08T17:28:06+5:302017-12-08T17:34:24+5:30
आखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत. केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली.
रत्नागिरी : ओखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत.
केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तामिळनाडूकडे परतणाऱ्या नौकांना २४ तासांसाठी थांबविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी आज दिली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव रत्नागिरीला भेट देणार आहेत.
ओखीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील बंदरांमध्ये अनेक बोटी आश्रयाला आल्या आहेत. शनिवार सायंकाळपासून सोमवारपर्यंत रत्नागिरीतील मिऱ्या बंदरात गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांतील १०८ नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या. त्यावर एकूण १६८२ खलाशी होते.
या सर्व बोटींना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी., निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, तटरक्षक दलाचे कमांडर एस. आर. पाटील, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर कार्यालयाचे इतर अधिकारी, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस, मत्स्य विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.
प्रशासनाच्या मदतीला विविध सामाजिक संस्थाही धावल्या. या कालावधीत खलाशांसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याची तसेच इतर बाबींची सुविधा प्रशासनाच्या या सर्व यंत्रणांनी त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या.
सोमवारी ओखी वादळ केरळच्या सागरी किनाऱ्यावरून ईशान्य दिशेकडे वळेल, असा प्राथमिक अंदाज होता. परंतु ते ईशान्येकडे वळण्याऐेवजी वायव्येकडे वळल्याने गुजरातच्या दिशेने पुढे गेले आहे. तरीही दोन दिवस सतर्कता बाळगण्यात आल्याने या बोटींना या बंदरातच थांबविण्यात आले होते. मात्र, आता येथील किनारपट्टीला धोका नसल्याने या नौका आता कालपासून परतू लागल्या आहेत.
गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथील नौकांना डिझेल, पेट्रोल देऊन काल जाण्याची परवानगी देण्यात आली. बुधवारी सकाळी केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांच्यासमवेत डॉ. दिनेश चेरूवात यांनी या नौकांची पाहाणी केली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव येणार आहेत. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे २४ नौका उभ्या केलेल्या आहेत. त्यापैकी २१ नौका केरळमध्ये नोंदणी झालेल्या आहेत, तर ३ नौकांची नोंदणी तामिळनाडूमधील आहे. मात्र, यावरील खलाशी केरळचे आहेत.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत विविध बंदरात आलेल्या नौकांची संख्या ९८ इतकी होती. मात्र, त्यानंतर ही संख्या १०७ वर पोहोचली. खलाशांची संख्या सुमारे १७०० पर्यंत पोहोचली होती. या बोटींना इंधन तसेच अन्नधान्यासाठी मिळून सुमारे ४५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता. किनारपट्टी सुरक्षित झाल्याने आवश्यक बोटींना इंधनाचा पुरवठा करून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. उद्या केरळमधील नौका निघतील. मात्र, तामिळनाडूच्या ३० नौका थांबवल्या आहेत.
ओखी वादळाचा सामना करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच मच्छीमार यांचे सहकार्य उत्तम लाभले. जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य केल्याने जिल्ह्यातील बोट बुडण्याचे वा मच्छीमाराला धोका पोहोचल्याची घटना ऐकिवात नाही. परराज्यातील नौका जिल्ह्यात आल्यानंतर बंदर विभागाला यंत्रणांनी सहकार्य केले, याबद्दल धन्यवाद.
- कॅ. संजय उगलमुगले,
प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी