बेपत्ता प्रौढाचा मृतदेह पऱ्याच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:01+5:302021-06-25T04:23:01+5:30
लांजा : सहा दिवसांपूर्वी घरामध्ये कुणालाही न सांगता बाहेर पडलेल्या बापेरे झोरेवाडी येथील ७५ वर्षीय प्रौढाचा मृतदेह येथील पऱ्याच्या ...
लांजा : सहा दिवसांपूर्वी घरामध्ये कुणालाही न सांगता बाहेर पडलेल्या बापेरे झोरेवाडी येथील ७५ वर्षीय प्रौढाचा मृतदेह येथील पऱ्याच्या पाण्यामध्ये बुधवारी सायंकाळी आढळून आला आहे. तो पऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापेरे झोरेवाडी येथील गोविंद जानू झोरे (७५) हे १८ जूनला सकाळी १०.३० ते सायंकाळी ३ वाजण्याच्या दरम्यान घरातील लोकांना न सांगताच बाहेर पडले होते. ते रात्री घरी न आल्याने घरातील लोक व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, ते कुठेही आढळून न आल्याने अखेर त्यांचा मुलगा महेश झोरे यांनी ते बेपत्ता झाल्याची खबर लांजा पोलीस स्थानकात दिली होती.
ग्रामस्थ व पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बापेरे लोटणकरवाडी येथील भरडीचा पऱ्या या ठिकाणी पाण्यामध्ये झाडीला अडकलेला मृतदेह सापडला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, राजेंद्र कांबळे, भालचंद्र रेवणे, दीपक कारंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जोरदार पावसामुळे पऱ्याला आलेल्या पुरामध्ये गोविंद झोरे हे वाहून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर हे करत आहेत.