Coronavirus in Maharashtra कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून निघाले होते गावी, घरी न पोहोचल्याने घेण्यात आला शोध .. मात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:00 PM2020-05-11T16:00:10+5:302020-05-11T16:03:19+5:30
त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले.
खेड : कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून गावी पायी यायला निघालेल्या तालुक्यातील हुंबरी येथील एका वृद्धाचा मृतदेह विन्हेरे गाव परिसरातील जंगलात आढळून आला. सदाशिव भिकू कदम असे या वृद्धाचे नाव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यानंतर घाबरलेल्या या वृद्धाने अन्य काही साथीदारांसह ३० एप्रिल रोजी ठाणे येथून चालायला सुरुवात केली होती.
लॉकडाऊनपूर्वी हुंबरी येथून ठाणे येथे गेलेले सदाशिव कदम हे देखील तिथेच अडकून पडले होते. आपल्या भागातील काही युवक पायी गावी निघाले आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनीही त्यांच्या सोबत पायी गावी यायचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी ठाणे येथून निघालेले कदम आणि त्यांचे सहकारी ६ मे रोजी कशेडी घाटाच्या पायथ्याला पोहचले. कशेडी येथे पोलीस बंदोबस्त असल्याने या लोकांनी जंगलातील वाटेने जाण्याचा निर्णय घेतला असावा. सदाशिव कदम यांनी कशेडी येथून आपल्या पत्नीला फोन करून आपण सायंकाळपर्यंत घरी पोहचत असल्याचे सांगितले. विन्हेरे येथील जंगलातून वाट काढताना त्यांचे सहकारी पुढे निघून गेले आणि ते एकटेच मागे पडले.
त्यांचे पत्नीशी झालेल्या बोलण्यानुसार ते ६ मे रोजी संध्याकाळपर्यंत ते हूंबरी येथे गावी पोहचायला हवे होते. मात्र, ७ तारीख उजाडली तरी ते गावी न पोहचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. नातेवाईकांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद होता. कदाचित कशेडी येथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात ठेवले असावे, असा समज करून नातेवाईकांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर खेड तालुक्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमध्येही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही आढळून आले नाही.
सदाशिव कदम यांचा शोध सुरु असतानाच ९ मे रोजी दुपारी खेड पोलिसांचा त्यांच्या नातेवाईकाना फोन आला. विन्हेरे येथील जंगलात एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले.