रत्नागिरी वाहतूक पोलिसांकडे बॉडी वॉर्न कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:35 PM2019-03-06T12:35:27+5:302019-03-06T12:36:16+5:30
रत्नागिरीच्या वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठे बळ उपलब्ध झाले आहे.
रत्नागिरी : वाहतूक नियमांचे पालन करताना काही जणांकडून वाहतूक पोलिसांबरोबर होणार चकमक, गैरवर्तन यापुढे पोलिसांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊन संबंधितांना शिक्षा व्हावी आणि पोलिसांचा कारभारही पारदर्शक रहावा, यासाठी रत्नागिरीच्या वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठे बळ उपलब्ध झाले आहे.
शहरातील मारुती मंदिर येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. वाहतूक पोलिसांना रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था पाहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहीजणांच्या गैरवर्तनाला, उध्दटपणालाही सामोरे जावे लागते. या कॅमेऱ्यामुळे वाहतूक नियमांबाबत गैरवर्तन करणाऱ्यांना आळा घातला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी १८ हजार किंमतीचे ६ तर ३८ हजार रुपये किंमतीचा एक व त्यासंबंधित यंत्रणा असे एकूण १ लाख ८० हजाराचे साहित्य जिल्हा नियोजनच्या निधीतून देण्यात आले आहे.