रायपाटण येथे तरुणाचा जळालेला मृतदेह
By admin | Published: January 22, 2017 11:30 PM2017-01-22T23:30:33+5:302017-01-22T23:30:33+5:30
राजापूर तालुक्यात खळबळ : गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज
राजापूर/पाचल : ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण खिंडीत सुमारे वीस ते पंचवीस वर्षीय तरुणाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून तरुणाचा गळा आवळून खून झाला असावा आणि नंतर त्याला जाळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी तो रायपाटण परिसराबाहेरचा असावा, असा अंदाज आहे.
रविवारी सकाळी सातच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. एका ट्रॅक्टर चालकाने रायपाटणच्या खिंडीत एक मानवी देह जळत असल्याचे पाहिले व त्यानंतर त्याने रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे यांना माहिती दिली. त्यानंतर नलावडे व पोलिस पाटील महादेव नेवरेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन खात्री करून घेतली व तत्काळ राजापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधला.
त्यानंतर रायपाटण पोलिस दूरक्षेत्रावरील पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी खिंडीतील रस्त्याच्या बाजूला गटारात एक मृतदेह जळत असल्याचे निदर्शनाला आले. सुरुवातीला पोलिसांनी जळत असलेला मृतदेह विझवला. तो मोठ्या प्रमाणावर जळाला होता. चेहऱ्यावर जळलेल्या अवस्थेत कापड चिकटलेले होते. निळ्या रंगाची पँट त्याने धारण केली होती. त्याच्या एका पायाला थोडीशी जखम झाल्याच्या खुणा दिसत होत्या, तर पायात चप्पल वा बूट काहीच नव्हते. हा तरुण अंदाजे वीस ते बावीस वर्षे वयाचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, सहायक पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती जगताप, पोलिस निरीक्षक विकास गावडे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तरुणाच्या अंगावर काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरीकडे पाठविला आहे. यावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत जाधव, प्रथमेश सावंत, बी. व्ही. जाधव, प्रसाद शिवलकर, साळवी, उपसभापती उमेश पराडकर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक सक्रे, रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, मनोहर सप्रे, प्रसाद पळसुलेदेसाई, अमोल शेट्ये, आप्पा साळवी, विकास कोलते, खापणे महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोहर खापणे आदी उपस्थित होते.
जळालेला मृतदेह ओळखणे अवघड असले तरी तो तरुण या परिसरातील
नसावा, अशी चर्चा सुरू आहे. त्या तरुणाची जीभ बाहेर आल्याने कदाचित त्याचा प्रथम गळा आवळण्यात आला असावा व नंतर त्याचा मृतदेह रायपाटणच्या खिंडीत आणून पेटवून देण्यात आला, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)