शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकांची भेट
By admin | Published: June 5, 2016 10:58 PM2016-06-05T22:58:45+5:302016-06-06T00:48:41+5:30
श्रीधर शिगवण : चिपळूण तालुक्यासाठी २३ हजार ४३५ पुस्तके उपलब्ध
राजेश कांबळे --अडरे --जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत केलेल्या मागणीनुसार शासनाकडून यावर्षी चिपळूण तालुक्यासाठी २३ हजार ४३५ पुस्तके प्राप्त झाली आहेत. काही दिवसातच प्रत्येक शाळेतील केंद्रप्रमुखांकडे ही पुस्तके देण्यात येतील. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांनी दिली.तालुक्यातील प्रत्येक शाळेने आॅनलाईन मागणी केल्यानुसार शिक्षण विभागाने ही पुस्तके वेळीच उपलब्ध केली आहेत. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवून पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मे महिन्याची सुटी संपल्यावर शाळा सुरु होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद दिसतो. यासाठी शासनाने वेळेवर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत शासनाकडून प्राप्त होणारी नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच वर्षी हाती पडावीत, अशी तयारी केली आहे. यावर्षी चिपळूण तालुक्यासाठी नवीन पुस्तके १७ मे रोजी आली आहेत. दरवर्षी अभ्यासक्रमात बदल होत असल्यामुळे पुस्तके लवकर उपलब्ध होत नाहीत. यावर्षी इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. यावर्षी चौथी उर्दू परिसर भाग २, सहावी उर्दू बालभारती, सेमी इंग्लिशमध्ये इंग्लिश व गणित, उर्दू गणित, मराठी, भूगोल, उर्दू भूगोल, सेमी सामान्य विज्ञान, उर्दू सामान्य विज्ञान, मराठी सुलभभारती, हिंदी सुलभभारती, उर्दू इतिहास नागरिक शास्त्र, सातवी उर्दू व इतिहास, आठवी उर्दू व इतिहास ही पुस्तके प्राप्त झाली नसून, शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात ही पुस्तके मिळतील. मागणीनुसार पुस्तकांमध्ये पहिली २ हजार ३९५, दुसरी २ हजार ३९५, तिसरी २ हजार ४४५, चौथी २ हजार ६२४, पाचवी २ हजार ९९१, सहावी ३ हजार २४६, सातवी ३ हजार ४८७, आठवी ३ हजार ८५२ यांचा समावेश आहे. काही विषयांची पुस्तके शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शिगवण यांनी दिली.