सायलीला दोघांनी पेटविले !

By admin | Published: September 7, 2014 12:33 AM2014-09-07T00:33:40+5:302014-09-07T00:33:58+5:30

मृत्युपूर्व जबाब : शाळेतील झुंज जिंकली; पण मृत्यूशी अपयशी

Both of them were burned! | सायलीला दोघांनी पेटविले !

सायलीला दोघांनी पेटविले !

Next

वाटूळ : राजापूर तालुक्यातील मंदरूळ गावची सायली संताजी पवार (वय १४) या आठवीत शिकणाऱ्या हरहुन्नरी मुलीचा पेटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण घर गणेशोत्सवाच्या आनंदात असतानाच पवार कुटुंबीयांवर नियतीने घाला घातला. सायलीने मृत्युपूर्व जबानीत दोन अज्ञात युवकांनी आपल्याला पेटविल्याचे सांगितल्याने यामागे घातपातच जास्त असल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
तीन दिवसांपूर्वी मंदरूळ गावातील पवारवाडीमध्ये ही घटना घडली. मंदरूळचे संताजी पवार यांची वाडीमध्ये दोन घरे असून, संपूर्ण कुटुंब जुन्या घरामध्ये गणेशोत्सवामध्ये व्यस्त होते. जुन्या घरापासून अवघ्या ४० ते ५० मीटर अंतरावर असलेल्या नवीन घरामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. सायली ही तिच्या नव्या घरामध्ये सुटीतील अभ्यास पूर्ण करीत होती. एक अवघड गणित सुटत नसल्याने बेचैन झालेल्या सायलीने दहा मिनिटांपूर्वी आपल्या जुन्या घरी येऊन गणकयंत्र घेतले व पुन्हा नव्या घरात एकटीच अभ्यासाला गेली. त्यानंतर ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
संताजी पवार हे कामानिमित्त मुंबईला असतात. घटनेदिवशी ते देखील एक दिवसासाठी गावी येऊन मुंबईला निघून गेले होते. सायलीची आई देखील आपल्या मोठ्या मुलीला घेऊन दवाखान्यामध्ये गेली होती. जुन्या घरामध्ये फक्त तिची आई व नातेवाईकच गौरी पूजनामध्ये व्यस्त होते. आजूबाजूला लाऊडस्पीकरचा आवाज असल्याने नव्या घरामध्ये पेटलेल्या सायलीचा आवाज लवकर कोणाला आलाच नाही. सायलीच्या काकीला आवाज ऐकू आल्यानंतर तिने दाराला धक्का मारून घरात प्रवेश केला असता सायलीच्या शरीराने पेट घेतल्याचे दृश्य त्यांनी पाहिले.
त्यानंंतर लगेचच वाडीतील सर्वांनी तिला उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु ७५ टक्केजळलेल्या सायलीची स्थिती गंभीर असल्याने तिला मिरज येथे नेण्यात आले. मिरज येथे उपचार सुरू असताना ४ सप्टेंबर रोजी सकाळी अखेर सायलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्युपूर्वी रत्नागिरी व मिरज या दोन्ही ठिकाणी सायलीने आपल्या जबानीमध्ये दोन अज्ञात युवकांनी माझे तोंड दाबून अंगावर बाटलीमध्ये आणलेले रॉकेल टाकून मला पेटविले व ते पळून गेल्याची जबानी एकदा नव्हे तीन वेळा दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणादेखील चक्रावली आहे. या जबानीमुळे सायलीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.
आपली मुलगी स्वत:हून असे करणार नाही यावर तिचे कुटुंबीय ठाम असल्याने अखेर ते दोन युवक कोण व ते केव्हा घरात आले व कृत्य करून पळून गेले याबाबत वाडीमधील सर्वजण अनभिज्ञ आहेत. रत्नागिरी पोलिसांसह राजापूर पोलीस याबाबत कसून चौकशी करीत आहेत. सायली शिकत असलेल्या वाटूळ हायस्कूलमध्ये शिक्षकदिनीच शाळेच्या पहिल्या दिवशी जेव्हा ही घटना सर्वांना समजली, तेव्हा तिच्या सर्व शिक्षकांसह सहकाऱ्यांनादेखील मोठा धक्का बसला. अत्यंत प्रतिभावान, हजरजबाबी व हरहुन्नरी सायलीची एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी आहे.
गणपती सुट्टी लागली त्यादिवशी सायलीने आपल्या वर्गातील सर्व मित्र मैत्रिणींना मोदक, चॉकलेटस् वाटली होती व गणपतीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. तिच्या या आठवणीने वर्गातील सर्वांनाच आपले अश्रू आवरता येत नव्हते. (वार्ताहर)
मार्क समजले पण...
शाळेच्या पहिल्याच दिवशी या घटक चाचणीचे गुण विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. अनेक विषयांमध्ये सायलीने पैकीच्या पैकी गुण मिळविले होते; परंतु हे गुण ऐकायला आज सायली मात्र वर्गामध्ये नव्हती. शाळेतील परीक्षेची झुंज जिंकणाऱ्या सायलीची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली.

 

Web Title: Both of them were burned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.