निवृत्त पोलिसाच्या कुटुंबावर बहिष्कार, रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:22 PM2022-12-27T12:22:34+5:302022-12-27T12:23:02+5:30
लग्न, जलदान विधी आणि शोकसभेवरही वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील हर्चे बौद्धवाडी येथील रहिवासी निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक गंगाराम पवार यांच्यासह कुटुंबाला वाडीतील लोकांनी वाळीत टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पवार कुटुंबाच्या लग्न, जलदान विधी आणि शोकसभेवरही वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. याबाबत पवार यांनी लांजा पोलिसांकडे धाव घेतली असून, कारवाईची मागणी केली आहे.
मुंबईतील हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मंडळाने घर फोडल्याचा आरोप पवार यांचे मोठे बंधू गोविंद पवार यांनी केला होता. त्याचा राग मनात ठेवून संपूर्ण वाडीने त्यांना बहिष्कृत केल्याचे म्हटले आहे. पवार बंधू हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मंडळ, मुंबईचे सभासद आहेत. पवार कुटुंबीयांनी वाडीतील बुद्धविहार बांधताना साडेतीन लाख रुपयांचे पाणी बांधकामाला दिले. त्याचे कोणतेही बिल त्यांनी घेतलेले नाही, तसेच या मंडळाने बुद्धविहार बांधकामासाठी फंड उभारणीस पावत्याही छापल्या होत्या. त्यासाठी घेण्यात आलेल्या पैशाची पावतीही पवार यांना दिलेली नाही.
दरम्यान, पवार यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाला बौद्ध मंडळासह वाडीतील भावकी व इतर ग्रामस्थांना निमंत्रित केले होते. त्यामध्येही वाडीतील कोणीही सहभागी झाले नाही. बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रणही देण्यात आले नाही, तसेच वाडीतील कोणत्याही सभेला बोलावले जात नाही, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मुंबई व इतर लोकांनी एकत्रित येऊन जातपंचायत निर्माण करून पवार कुटुंबाला वाळीत टाकल्याचे अशोक पवार यांनी म्हटले आहे. वाडीतील काही ग्रामस्थांनी ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पवार यांनी लांजा पोलिसांकडे केली आहे.
ग्रुपमधून रिमूव्ह
पवार यांचे पुतणे अनिरुद्ध गोविंद पवार याने वडिलांच्या जलदान विधी आणि शोकसभेचा संदेश व्हाॅटस्ॲप ग्रुपवर पाठविला होता. त्यानंतर तत्काळ पवार यांचा मुलगा आकाश, पुतण्या अनिरुद्ध, मनोज यांना त्या ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले.
भावकी संघटनेचे सहकार्य नाही
मुंबईतील मंडळातील पदाधिकाऱ्याने ग्रुपवर संदेश टाकून जे सभासद भावकी संघटनेचे नियम पाळणार नाहीत, अशा सभासदांच्या कोणत्याही सुख-दु:खाच्या कार्यक्रमात भावकी संघटनेचे सहकार्य राहणार नाही, असा निर्णय सर्व सभासदांच्या सहमतीने घेण्यात आल्याचे व्हाॅटस्ॲप ग्रुपवर पाठविला होता.