लसीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:54+5:302021-04-21T04:31:54+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता ...

Break the vaccination | लसीकरणाला ब्रेक

लसीकरणाला ब्रेक

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. शासनाने आता सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्याचे आदेश दिले असले तरी त्या तुलनेने लसीचा साठा अपुरा पडत असल्याने आता नागरिकांना लस अपुरी पडत आहे.

आरोग्य यंत्रणेची धावपळ

रत्नागिरी : जिल्ह्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राबत असलेल्या आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण येत आहे. या यंत्रणेकडे मनुष्यबळही अपुरे आहे. त्यामुळे या रुग्णांना सेवा देताना यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहे. कर्मचाऱ्यांना दोन दाेन पाळ्यांमध्येही अविरत सेवा द्यावी लागत आहे.

मोकाट श्वान वाढले

रत्नागिरी : जिल्हाभरात कोरोनाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहने दोन्हींची वर्दळ थांबली आहे. रात्री ८ वाजल्यानंतर तर रस्त्यावर सामसूम असते. मात्र, रस्त्यावर शुकशुकाट असला तरी मोकाट श्वान झुंडीने वावरत असतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या श्वानांचा चांगलाच धसका घेतला आहे.

रस्ता दुरुस्तीचा त्रास

रत्नागिरी : शहरातील अनेक भागातील रस्ते सध्या खोदलेले आहेत. काही रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे चर खणून ठेवले आहेत. रात्रीच्या वेळी हे चर लक्षात येत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडचणीचे होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना हे चर दिसत नसल्याने बरेचदा दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

धामणी ग्रामपंचायतीचा उपक्रम

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्त रहावे, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसींबाबत गावातील लोकांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता या लसीकरणाला ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत १४० ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे.

कामगारांमध्ये द्विधा अवस्था

चिपळूण : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे यात काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबले आहेे. मध्यंतरी लाॅकडाऊन संपल्यानंतर हे कामगार पुन्हा परतले होते. मात्र, आता पुन्हा तीच परिस्थिती आल्याने आपल्या गावी परतावे की इथे रहावे, अशी त्यांची द्विधा अवस्था झाली आहे. काही कामगारांनी परतण्यास सुरुवात केली आहे.

हाॅटेल्सना फटका

दापोली : येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊन काळात घरपोच सेवा आणि पार्सलवगळता हाॅटेल्स, रेस्टाॅरंट यांनाही सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभर या व्यवसायाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने या व्यवसायाला माेठा आर्थिक फटका बसला आहे. खर्च कसा भागवायचा, ही चिंता सतावत आहे.

गाळ उपसा सुरू

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीक असलेल्या देवडे गावातील काजळी नदी गाळ उपसा प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र १ किलोमीटर लांब, ८० मीटर रुंद, दोन मीटर खोल करण्यात आले आहे. हे काम नाम फाउण्डेशनने दिलेल्या पोकलॅण्ड यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे.

कडक लाॅकडाऊन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे गावात १८ ते २६ एप्रिल या सात दिवसांच्या कालावधीत कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला आहे. आरोग्यसेवा आणि दवाखानेवगळता कुठलीही दुकाने सुरू ठेवण्यात आलेली नाहीत.

खेळही थांबले

गुहागर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. त्यामुळे आता मोकळ्या मैदानांवर सुरू असलेल्या खेळांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे मोकळी मैदानेही सुनीसुनी झाली आहेत.

Web Title: Break the vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.