पाठपुराव्यामुळे पूल वाहतुकीला खुला : प्रशांत यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:35 AM2021-09-06T04:35:59+5:302021-09-06T04:35:59+5:30
अडरे : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील रखडलेला नवीन पूल अखेर शनिवारी वाहतुकीसाठी खुला झाला ...
अडरे : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील रखडलेला नवीन पूल अखेर शनिवारी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्यामुळे या पुलाचे काम पूर्णत्वाला गेले आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांमधून केली होती. याची दखल घेऊन केंद्र शासनाने या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला हिरवा कंदील दिला आणि गेल्या काही वर्षांपासून कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलाच्या कामालादेखील सुरुवात झाली होती. परंतु, सातत्याने या पुलाचे काम रखडत होते. दोनच दिवसांपूर्वी या पुलाची तांत्रिक तपासणी करण्यात आली आणि शनिवारी या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर जुना पूल आपत्कालीन परिस्थितीत वापरला जाईल, असे सांगण्यात आले आहे. याबाबत चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल वाहतुकीला खुला झाला असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्यामुळे यश आल्याचे त्यांनी सांगितले.