अर्जुना नदीवरील पूल धाेकादायक, ३० गावांचा पाचलशी संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:18+5:302021-08-20T04:35:18+5:30
पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. ...
पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. प्रशासनाबरोबरच राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही या दुर्घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे ३० गावांचा पाचल बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडली की, प्रशासन, लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गावर टाकून मोकळे होतात. जबाबदारीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. अर्जुना नदीचा पूल वाहून जाण्यास निसर्ग जबाबदार नसून प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केलेल्या मानवनिर्मित चुका व या पुलाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हा पूल वाहून गेल्याचे अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. सन २०१८मध्ये शासनातर्फे या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मनसेतर्फे हे काम थांबविण्यात आले होते. पुलाची डागडुजी नको तर नव्याने पूल बांधण्याची मागणी मनसेने शासनाकडे केली होती. मात्र, आमच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आमच्या मागणीची दखल घेऊन हा पूल नव्याने बांधला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे सौंदळकर यांनी सांगितले.
या भागातील ३० गावांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाला पर्यायी पूल शासनाने बांधायला हवा होता. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे जनतेला हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल सौंदळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाचल बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.