पूल सुरू होण्याआधीच पुलाची भिंंत कोसळली-: बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:53 PM2019-03-28T22:53:24+5:302019-03-28T22:55:18+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवा पूल सुरू होण्याच्या आधीच पुलाचा काही भाग कोसळल्याने या बांधकामाच्या ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवा पूल सुरू होण्याच्या आधीच पुलाचा काही भाग कोसळल्याने या बांधकामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही घटना गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
भरणे येथील जगबुडी नदीवर १९३१ साली उभारण्यात आलेल्या व मुंबई - गोवा महामार्गावरील अपघाताच्या दृष्टीने संवेदनशील बनलेला दीडशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल हा या महामार्गावरून धावणाऱ्या हजारो वाहनांसाठी एक सेतूच आहे. मात्र, ११८.२५ मीटर लांबीचा असलेला जुना पूल सद्यस्थितीत अखेरची घटका मोजत आहे. पुलाच्या बांधकामाची मुदतही संपुष्टात आल्याने या पुलावरून वाहने हाकताना जीव मुठीत धरावा लागत आहे. जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनलेला आहे.
दि. १९ मार्च २०१३ रोजी जगबुडी पुलावर महाकाली या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात ३७ जणांचे हकनाक प्राण गेल्यानंतर पुलाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर जगबुडीवर नव्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ८ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता झाल्यानंतर ५ वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधकामाचा नारळ फुटला.
नदीच्या पात्रापासून नऊ मीटर अंतरावर ११६ लांबी व १२ मीटर रुंदीच्या दुपदरी पूल बांधण्याच्या कामाला गतीही मिळाली. मात्र त्यानंतर पूल उभारणीच्या कामाची गती मंदावली होती. दि. २ आॅगस्ट २०१६ मध्ये महाड येथील सावित्री पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने भरपावसातदेखील काम सुरूच ठेवले होते. सद्यस्थितीत नव्या जगबुडी पुलाची उभारणी जवळपास पूर्ण झाली असली तरी किरकोळ काम अपूर्ण स्थितीत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे रखडलेले काम सुरू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा आंदोलने केली. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव करून महामार्ग रुंदीकरणात नवीन होणाऱ्या मार्गाला हा पूल जोडण्याचे काम गेले अनेक दिवस सुरू आहे. त्यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव करून हा पूल मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी अहोरात्र काम सुरू आहे.
गुरुवारी सकाळी या पुलाच्या कॉलममध्ये मातीचा भराव करण्याचे काम सुरू असताना अचानक या पुलाची भिंंत तुटून पडली तर पुलाच्या शेवटच्या भिंंतीला तडा गेला आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, हा पूल सुरू होण्याच्या आधीच धोकादायक बनला आहे.या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले साहित्य तकलादू असून, या पुलाच्या भिंंती कधीही तुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मातीचा भराव करण्याचे काम थांबविण्यात आले आहे.याप्रकरणी राष्टÑीय बांधकाम विभागाचे महाड येथील अधिकारी गायकवाड यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.