मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या भेंगांनी उडवली धावपळ
By admin | Published: July 16, 2017 06:06 PM2017-07-16T18:06:50+5:302017-07-16T18:06:50+5:30
यंत्रणा जागी : पूलाला धोका नसल्याचा अभियंत्यांचा निर्वाळा
आॅनलाईन लोकमत
लांजा (जि. रत्नागिरी), दि. १५ : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील पुलावर भेगा पडल्याचे वृत्त कळताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र, या भेगांपासून पुलाला कोणताही धोका नसल्याचे ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
वाकेड पुलावर भेगा पडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. लांजा बसस्थानक नियंत्रक दिलीप वाडेकर यांनी लांजा पोलिसांना याची पूर्वकल्पना दिली. त्यानुसार पोलिसांनी तहसीलदार मारूती कांबळे यांना पुलाला भेगा पडल्याची खबर दिल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांगरीकर, हेडकॉन्टेबल संतोष झापडेकर, वाकेड सरपंच जयश्री भितळे, पोलीसपाटील जयवंत जाधव, माजी सरपंच गोपाळ सावंत, ग्रामसेविका आर. व्ही. घाग, संदेश जाधव उपस्थित होते.
वाकेड पुलावर भेगा पडल्याचे दिसल्याने तहसीलदार कांबळे यांनी लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची देखभाल करणाऱ्या ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीकडे संपर्क साधला. त्यानुसार कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम व सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पुलाची पाहणी केली. यावेळी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील भागालाच भेग पडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या भेगेचा पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. महामार्गावरील या पुलाचे पंधरा वर्षापूर्वी सहा ते सात फूट रुंदीकरण करण्यात आले होते. हे रुंदीकरण व जुन्या पुलाचे डांबरीकरण एकजीव न झाल्याने दहा ते बारा फुटांपर्यंत ही भेग गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महाड सावित्री नदीवर गेल्यावर्षी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. वाकेड पुलावर भेगा पडल्याचे समजताच काहींनी महाड दुर्घटनेच्या आठवणी जाग्या केल्या. मात्र, संबंधित कंपनीच्या अभियंत्यांनी वाकेड पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगताच प्रशासनासह प्रवाशांचा जीवही भांड्यात पडला.