जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची उज्ज्वल कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:31+5:302021-08-18T04:37:31+5:30
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ ...
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ प्लस" (अधिक हागणदारीमुक्त) म्हणून घोषित झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी दिली.
सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्यातील सोवेली ग्रापपंचायत, दापोली तालुक्यातील देहेण-तुरवडे ग्रातपंचायत, चिखलगाव ग्रामपंचायत, खेड तालुक्यातील भिलारेआयनी ग्रामपंचायत, चिपळूण तालुक्यातील मोरवणे खुर्द ग्रामपंचायत, गुहागर तालुक्यातील काताळवाडी - अंजनवेल ग्रामपंचायत, रत्नागिरी तालुक्यातील चक्रदेव- मेर्वी ग्रामपंचायत तसेच संगमेश्वर तालुक्यातील सागवे ग्रामपंचायत अशा ८ ग्रामपंचायती ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आल्या.
राज्य शासनाच्या मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृश्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद, चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करून ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या गेल्या आहेत. अधिक हागणदारीमुक्त गाव असे त्यांना संबोधले जाते.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करून स्वच्छता शाश्वत ठेवावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ए. बी. मरभळ यांनी केले आहे.