कबड्डीसाठी तरूण पुढे यावेत
By admin | Published: September 11, 2014 09:48 PM2014-09-11T21:48:38+5:302014-09-11T23:12:28+5:30
प्रशांत चव्हाण : ‘जयपूर पिंक’च्या खेळाडूचा गौरव
चिपळूण : क्रिकेटला सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे. मात्र, लाल मातीतला कबड्डी खेळ हा मातीत राहिला. आता राष्ट्रीय स्तरावरदेखील या खेळाला रसिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने या खेळात तरुण खेळाडूंनी पुढे यायला हवे, असे प्रतिपादन जयपूर संघातील खेळाडू व मार्गताम्हाणेचा सुपुत्र प्रशांत चव्हाण यांनी येथे केले. जयपूर पिंक पँथर संघातून अभिनेते अभिषेक बच्चन यांच्या संघात खेळण्याची संधी प्रशांत याला राष्ट्रीय स्तरावर मिळाली. मनाली भोबस्कर हिने स्वागत गीत सादर केले. त्याबद्दल सुशील वेल्हाळ यांच्यातर्फे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
जयपूर टीममधून चव्हाण याने खेळताना अप्रतिम कामगिरी करताना कोकणचे नाव उज्ज्वल केले. चव्हाण यांनी यापुढे झेप घ्यावी व जगात असेच चमकत राहावे, असे आवाहन कदम यांनी आपल्या भाषणात केले.
माजी सभापती नंदकिशोर पवार यांनीही चव्हाण यांच्या रूपाने लाल मातीची शान अधिक वाढल्याचे मत व्यक्त केले. चव्हाण यांच्या क्रीडाकौशल्याचे पवार यांनी कौतुक केले. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मार्गताम्हाणे महिला मंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नीलम गोंधळी, अनिलकुमार जोशी यांच्या हस्ते काँग्रेसचे प्रवक्ते प्रभाकर जाधव, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनतर्फे प्रशांत याचा सत्कार करण्यात आला. संजय कराडे, प्राची जाधव, मनीषा भोबस्कर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहन चव्हाण यांनी केले. दीपक देवकर यांनी सूत्रसंचालन केले. अजित साळवी यांनी आभार मानले.
यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश कदम, माजी सभापती नंदकिशोर पवार, विजया नातू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुशील वेल्हाळ, कबड्डीपटू प्रताप शिंदे, यशवंत गोंधळी, चंद्रकांत चव्हाण, प्रताप चव्हाण, नीलेश चव्हाण, मनोहर चव्हाण, जयसिंग मोरे, मोहन चव्हाण, नीलम गोंधळी, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर नार्वेकर, उपसरपंच सीताराम घाणेकर, अजित साळवी, मुख्याध्यापक संदीप गोखले आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
चव्हाण याने कबड्डीची सुरुवात ओम कबड्डी संघ, कल्याण येथून केली. नांदेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून दिले. अमरावती येथे राज्याला २८ वर्षांनी कबड्डी स्पर्धेत विजय मिळवून दिला. २००७ ते २०११ राज्य कबड्डी संघाचे नेतृत्व केले असून, त्याला जयपूर पिंक पँथर संघातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.
कबड्डीपटू प्रशांत चव्हाण यांचे चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर बहादूरशेख नाक्यापासून वाजतगाजत फटाक्यांची आतषबाजी करुन मार्गताम्हाणेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मालघर, तांबी, रामपूर येथेही त्याचा सत्कार करण्यात आला. मार्गताम्हाणे येथे पद्मावतीचे दर्शन घेऊन शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.