रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:42 PM2018-01-09T16:42:29+5:302018-01-09T16:47:26+5:30
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी साधारण दोन कोटी रुपये शिक्षणावर खर्च करतो. यामध्ये नवीन शाळा बांधणे, शाळा दुरुस्ती करणे आदी कामे होत असतात. मात्र, आरवली येथे मागणी करुनही वर्गखोल्या मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
आरवली केंद्र शाळेतील विद्यार्थी हे धोकादायक व गळक्या शाळेत बसत असतानादेखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. या शाळेची दुरुस्ती वेळेत केली गेली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
आरवली हे मुंबई - गोवा महामार्गवरील गजबजलेले ठिकाण असून, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या मार्गावरील असलेल्या या केंद्र शाळेकडे त्यांचे का लक्ष जात नाही, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या येथील केंद्र शाळेत ६७ मुली आणि ६७ मुले अशी एकूण १३४ पटसंख्या आहे. परंतु, येथील विद्यार्थ्यांना दररोज भीतीच्या सावटाखालीच अभ्यास करावा लागत आहे.
शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेडचे वितरण करण्यात आले. मात्र, आरवली शाळेला किचनशेड दिलेली नाही.
किचनशेड वितरणाची जबाबदारी ही ठेकेदारावर असताना किचनशेड का देण्यात आली नाही, याची चौकशी तालुका शिक्षणाधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर चालू आर्थिक वर्षात शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशीही मागणी केली होती.