बीएसएनएलची कामगार कपात
By admin | Published: May 27, 2016 10:38 PM2016-05-27T22:38:05+5:302016-05-27T23:24:40+5:30
संगमेश्वरातील प्रकार : महाप्रबंधकांचा निर्णय अन्यायकारक; सर्वपक्षीय नेते एकवटणार
आरवली : भारत संचार निगमच्या संगमेश्वर कार्यालयातील कामगार कमी केल्याने या कार्यालयाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहक सेवेवर होत आहे. संगमेश्वर कार्यालयांतर्गत विस्तारलेल्या सेवा आणि भौगोलिक परिस्थिती याचा विचार न करताच अचानक कामगार कमी केल्याने या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. संगमेश्वरमधील बीएसएनएलच्या कारभाराबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी दखल घेतली असून, याबाबत महाप्रबंधकांना जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या बीएसएनएलच्या संगमेश्वर कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. संगमेश्वरचे कार्यालयाच्या कामगार कपातीच्या आडमुठ्या धोरणामुळे याचा परिणाम थेट ग्राहक सेवेवर होत आहे. या कार्यालयांतर्गत आठ दूरध्वनी केंद्र चालतात. त्यामध्ये आंबेड, पोचरी, फुणगूस, करजुवे, माखजन, आरवली, कडवई, नायरी यांचा समावेश आहे. दूरच्या अंतरावर असणारी दूरध्वनी केंद्र आणि या केंद्रांचा कार्यभार केवळ पाच लाईनमन सांभाळत आहेत. त्यामुळे या लाईनमनची दमछाक होताना दिसत आहे.
या कार्यालयांतर्गत उपळे, वांद्री, साखळकोंड, आंबेड, नायरी, कडवई , बुरंबी, माखजन, आरवली, आदी ठिकाणी मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. हे सर्व मोबाईल टॉवर सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. हा सर्व कार्यभार पाच लाईनमन यांच्यासोबत युनिटच्या माध्यमातून काम करणारे कंत्राटी कामगार व्यवस्थितरित्या सांभाळत होते. मात्र, नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या महाप्रबंधकांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे. यामुळे या कामगारांची उपासमार होत असून, याचा जास्त फटका ग्राहकवर्गाला बसत आहे.
संगमेश्वर येथील बीएसएनएल कार्यालय हे नेहमी गजबजलेले असते. मात्र, गेले महिनाभर या कार्यालयातील वर्दळ मंदावली आहे. संगमेश्वर ग्राहक सेवा केंद्र येथे एस.आर.टी.ओ.ए यांच्या मदतीकरिता असणारे कंत्राटी कामगार कमी केल्यामुळे सीमकार्ड विक्री, टॉप-अप, कार्ड रिप्लेसमेंटचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. संगमेश्वर कार्यालयात सुरू असणारा सी.एस.सी विभाग पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहेत.
संबंधित कामगारांचे कंत्राट संपले असेल तर त्याच कंत्राटदारदाराच्या अंतर्गत काम करणारे देवरुख कार्यालयातील कामगार कामावर कसे? हा प्रश्नदेखील अनुत्तरीत आहे. भविष्यात जर भारत संचार निगममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणात बदल झाला नाही तर ग्राहक विरुध्द अधिकारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
राजकीय नेते सरसावले : महाप्रबंधकांना कपातीबाबत जाब विचारणार
संगमेश्वर परिसरातील विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर या कार्यालयातील कारभार सुरळीत सुरू झाला नाही तर याचा जाब महाप्रबंधकांना सर्वपक्षीय पदाधिकारी विचारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कामगार कपातीचा सेवेवर झालेला परिणाम व त्यामुळे ग्राहक वर्गाची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी संगमेश्वर येथील एका बड्या नेत्याने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजनही केले आहे. त्यामुळे संगमेश्वरातील दूरध्वनी कार्यालयात सुरू असलेल्या घडामोडींमुळे नवा संघर्ष उभा राहण्याची भीती आहे.