ऑक्सिजन बेड, अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्याची बसपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:59+5:302021-05-09T04:31:59+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाने रत्नागिरी जिल्ह्यात वाढ होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड, आय.सी.यू. बेड वाढवून द्यावेत, तसेच आवश्यक असल्यासच रॅपिड ...
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाने रत्नागिरी जिल्ह्यात वाढ होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड, आय.सी.यू. बेड वाढवून द्यावेत, तसेच आवश्यक असल्यासच रॅपिड चाचणीऐवजी आर. टी. पी. सी. आर. चाचणी करावी, अशा मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना शुक्रवारी देण्यात आले.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस पसरत असून रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाभरात रुग्णांना बेड कमी पडत आहेत. ऑक्जिनचा तुटवडा भासत आहे. आय.सी.यू. बेड उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोविड सेंटरमधील गंभीर आजाराच्या रुग्णांची परिस्थिती बघून अन्य रुग्ण घाबरूनच मृत्युमुखी पडत आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण जिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, खाजगी रुग्णालय आदी ठिकाणी जेथे जेथे कोविड सेंटर आहेत त्या त्या ठिकाणी रुग्ण बेड संख्या कमी पडत आहेत, त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून आय.सी.यू. बेडची संख्याही वाढवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कोविड टेस्ट करताना आर.टी.पी.सी.आर. या चाचणीवर अधिक भर द्यावा, अशी मागणही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर बसपाचे जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, रत्नागिरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेश जाधव, वाटद (रत्नागिरी) चे सेक्टर महासचिव मुकेश जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत.
सद्य:स्थितीचा विचार करून या मागण्यांबाबत विचार करावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.