म्हैस आडवी आल्याने बस गटारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:34+5:302021-08-13T04:36:34+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे एसटी बससमोर अचानक म्हैस आडवी आल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकण्याचा प्रकार गुरुवारी ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे एसटी बससमोर अचानक म्हैस आडवी आल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ९ वाजता घडला. सुदैवाने प्रवासी बचावले आहेत. या घटनेमुळे प्रवासी एसटीविना तीन तास मारळ येथे ताटकळत राहिले होते. गाडी उशिरा आल्यामुळे प्रवाशांनी देवरूख आगाराच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
देवरूख आगारातून सकाळी ८ वाजता देवरूख - बामणोली - ओझरे ही बस सुटली हाेती. तेथून प्रवाशांना घेऊन परतत असताना गवतमाळ ते मारळ या दरम्यान बससमोर अचानक म्हैस आडवी आली. तिला वाचवण्यासाठी बसचालकाने ब्रेक मारला. या वेळी एसटी बस रस्त्याच्या कडेवर जाऊन धडकली.
कळकदरा मार्गी रस्ता नसल्याने वाहतूक बंद आहे परिणामी खडी कोळवण निनावे बोंड्ये येथील ग्रामस्थ देवरूख येथे ये-जा करण्यासाठी देवरूख - बामणाेली - ओझरे बस फेरीवर अवलंबून असतात. त्यामुळे या बसफेरीला प्रवाशांची गर्दी असते. एसटी रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकली. या प्रवाशांना देवरूख येथे जाण्यासाठी देवरूख आगारातून दुसरी बसफेरी सोडणे गरजेचे होते. ही बसफेरी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांना तीन तास तेथेच उभे राहावे लागले. देवरूख आगाराच्या या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
120821\1747-img-20210812-wa0035.jpg~120821\img-20210812-wa0036.jpg
बस गटारात~बस गटारात