पैसे भरूनही सदनिका न देणाऱ्या बिल्डरवर गुन्हा
By admin | Published: February 27, 2017 11:22 PM2017-02-27T23:22:39+5:302017-02-27T23:22:39+5:30
ठार मारण्याची धमकी; चिपळूणमध्ये महिलेची फिर्याद
रत्नागिरी : पूर्ण पैसे भरूनही फ्लॅटचा ताबा देण्यास नकार दिल्याबद्दल चिपळूणमधील बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्राबाबत रत्नागिरीमध्ये काही गुन्हे दाखल झालेले असताना आता चिपळूणमध्येही असा प्रकार पुढे आला आहे.
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील राजश्री राजन पावसकर यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. सदनिकेचा ताबा न देता १८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बिल्डर शरद पर्वतराम कदम (चिपळूण) यांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील मौज खांदाट, नवीन कोळकेवाडी येथे इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही सदनिकेचा ताबा दिला जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पर्वतराम कदम यांनी खांदाट येथे निसर्ग गृहप्रकल्प उभारला आहे. या इमारतीमध्येराजश्री पावसकर यांनी २ व ३ क्रमांकाच्या सदनिका सुमारे १८ लाख ८० हजार रुपये किमतीला खरेदीखत करून खरेदी केली होती. त्याचे पैसे त्यांनी वेळेत पोहोच केले होते. तरी या इमारतीतील मालकीच्या सदनिकेचा ताबा देण्यास
शरद कदम नकार देत होते. त्यामुळे पावसकर २६ फेब्रुवारीला शरद कदम यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेल्या. कदम यांनी सदनिकेचा ताबा देण्यास नकार दिला. त्याचबरोबर ठार मारण्याची धमकी दिली, असे पावसकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
आपली फसवणूक झाली असल्याचे राजश्री पावसकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ चिपळूण पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शरद कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ५०९, ५०६ तर ओनरशिप फ्लॅट अॅक्ट १९६३ चे कलम ३/१३ (१) कलम ५/१३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत. (वार्ताहर)