वेळणेश्वर कॉलेजची इमारत होणार कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:16+5:302021-04-15T04:30:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या २३८ वर पोहोचली आहे. वेगाने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा ...

The building of Velneshwar College will be Kovid Care Center | वेळणेश्वर कॉलेजची इमारत होणार कोविड केअर सेंटर

वेळणेश्वर कॉलेजची इमारत होणार कोविड केअर सेंटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गुहागर : तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या २३८ वर पोहोचली आहे. वेगाने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा वेळणेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन इमारतींमधून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून यामध्ये तब्बल १०० बेड्‌सची व्यवस्था होणार आहे. असे असले तरी येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा नसल्याने रुग्णांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. सद्यस्थितीत सर्वच रुग्ण कामथे येथे पाठवले जात आहेत.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्यानंतर वेळणेश्वर इंजिनिअरिंगच्या दोन इमारती ताब्यात घेतल्या. पुन्हा एकदा या इमारतींचा ताबा प्रशासनाने घेतला असून अद्याप रुग्ण ठेवण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

या दोन इमारतींमध्ये ५१ रूम असून, यामध्ये १०० बेड्‌सची व्यवस्था आहे. याआधी ७५ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सेवा नसल्याने फक्त विलगीकरणामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. तब्बल सात महिने कोविड सेंटर सुरू राहिल्यानंतर रुग्णसंख्या घटल्याने ऑक्टोबर २०२० मध्ये तब्बल ७ महिन्यांनी प्रशासनाने ताबा सोडला होता. यादरम्यान दोन्ही इमारतींचे प्रत्येकी २ लाख भाडे व वीज बिल असे एकूण २८ लाख रुपये भाडे झाले. कॉलेज प्रशासनाला यापैकी फक्त २ लाख रुपये प्रशासनाकडून देण्यात आले असून २६ लाख रुपये येणे बाकी आहे. याबाबत जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाकडे कॉलेजतर्फे पत्रव्यवहार करूनही भाडे रक्कम दिलेली नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा या दोन इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.

गेल्यावर्षी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था सुरुवातीला मार्गी लागली नव्हती. त्यानंतर हेदवीतील उदय जाधव यांच्याकडून रुग्णांना भोजन, चहा, नाष्टा पुरविला जात होता. मात्र उदय जाधव यांच्या बिलापैकी सुमारे ३ लाख २७ हजार इतकी रक्कम शासनाने दिलेली नाही. त्यामुळे नव्याने कोविड सेंटर सुरू हाेताना आधीची बिले अदा करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाला करावी लागणार आहे.

गतवर्षी कोविड केअर सेंटर सुरू असताना अन्य व्यवस्था नीट मार्गी लागल्या नाहीत. कॉलेज परिसरात दहाहून अधिक इमारती असताना, कोविड सेंटरच्या कोणत्या दोन इमारती, याचा फलक लावावा. पहिल्या दिवसापासून कोविड रुग्णांचा व बायोमेडिकल कचरा, तेथील शिल्लक अन्नपदार्थांची विल्हेवाट लावणे, पाणी व्यवस्था आदी गतवर्षीच्या आलेल्या अडचणी लक्षात घेऊन चांगले नियोजन करावे, जेणेकरून कॉलेज प्रशासनाला व इतरांनाही कोणताही त्रास होणार नाही, अशा सूचना कॉलेज प्रशासनाने केल्या आहेत.

फक्त देखरेखीसाठीच

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी देवीदास चरके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन वेळणेश्वर कोविड सेंटरमध्ये फक्त विलगीकरणात ठेवले जाणार आहे. येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा नसल्याने मागच्याप्रमाणेच गंभीर स्थितीतील रुग्णांना कामथे किंवा रत्नागिरी येथे पाठविले जाणार आहे.

केवळ बांधिलकी म्हणून

वेळणेश्वर कॉलेजचे ऋषिकेश गोखले यांनी सांगितले की, मागील भाड्यापोटीचे बहुतांशी बिल थकीत असतानाही, केवळ सामाजिक बांधिलकीपोटी संस्थेचे प्रमुख डॉ. विजय बेडेकर यांनी कोविड सेंटरसाठी इमारतीचा ताबा प्रशासनाला दिला आहे. मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: The building of Velneshwar College will be Kovid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.