इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:19+5:302021-06-18T04:22:19+5:30
रत्नागिरी : शहरातील ७९ इमारती धोकादायक आहेत. कुठल्याही क्षणी या इमारती कोसळू शकतात. वादळी पावसाचा धोका या इमारतीला असल्याने ...
रत्नागिरी : शहरातील ७९ इमारती धोकादायक आहेत. कुठल्याही क्षणी या इमारती कोसळू शकतात. वादळी पावसाचा धोका या इमारतीला असल्याने इमारत मालकांना येथील नगर परिषदेने नोटीस बजावली आहे. यापैकी २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे. तर ५१ इमारती पूर्णपणे धोकादायक झाल्या आहेत.
मनरेगा अंतर्गत उलाढाल
राजापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी होत आहे. वैयक्तिक फळबाग लागवडीतून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये ५१ लाख ६ हजार ५२३ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
नांगरणी महागली
लांजा : गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही या दरवाढीचा फटका बसला आहे. शेती, मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा बैलजोडी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पेन्शन रखडली
रत्नागिरी : सेवानिवृत्तीधारकांचे निवृत्ती वेतन अजूनही अनियमितच आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेतन अनियमित झाल्याने सेवानिवृत्तीधारकांचे आर्थिक प्रश्न वाढले आहेत. हे ज्येष्ठ नागरिक पेन्शनवरच अवलंबून असल्याने पेन्शनच अनियमित झाल्याने सर्व व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
कोरोना रोखण्यासाठी सज्ज
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन करुनही ही संख्या अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आता काही गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यासाठी पवित्रा घेतला आहे. गावांमध्येच आता स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारुन रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
कोरोना तपासणी
देवरुख : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाचही कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. मात्र हे झोन सध्या वादात अडकले आहेत. आरोग्यतर्फे या क्षेत्रातील नागरिकांची पोलीस बंदोबस्तात कोरोनाविषयक तपासणी सुरु करण्यात आली आहे. यात धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव या गावांचा समावेश आहे.
बसस्थानकाचे काम रखडले
रत्नागिरी : २०१४ साली बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर रत्नागिरीच्या हायटेक एस.टी. बसस्थानकाच्या उभारणीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु आता ७ वर्षे झाली तरीही बसस्थानकाची उभारणी अद्याप अपूर्णच आहे. परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनीही याची दखल घेतलेली नाही.
रस्त्यांवरच खड्डे
रत्नागिरी : येथील नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यावर घाईगडबडीत डांबरीकरण केले. मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पसरले आहेत. शहरातील टिळक आळी येथील नवीन रस्ता पूर्णत: खड्डेमय झाल्याने नागरिकांना त्रासदायक होत आहे.
मास्क व फळांचे वाटप
खेड : तालुक्यातील मेडिकल कामगार संघटनेतर्फे नगरपालिकेचे कोविड सेंटर, शिवतेज कोविड सेंटर या तीन उपचार केंद्रातील रुग्णांना मास्क, सॅनिटायझर आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी मेडिकल संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मोरे, उपाध्यक्ष दिनेश भिलारे आणि सचिव राजीव माळी, विवेक चाळके आदी उपस्थित होते.
शाळांची दुरुस्ती
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीकरिता उपसरपंच संतोष बांडागळे आणि सदस्या रेवती पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. कनकाडी ब्राह्मणवाडी, गराटेवाडीतील जिल्हा परिषद शाळा सर्वात जुनी आहे. या शाळेत विविध निवडणुकांचे मतदान केंद्र असते. मात्र ही शाळा नादुरुस्त झाली आहे.