विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:59+5:302021-06-20T04:21:59+5:30
राजापूर : शेतामध्ये जोताला बांधलेल्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने एक बैल जागीच ठार झाला असून, दुसरा बैल बेशुध्द झाल्याची ...
राजापूर : शेतामध्ये जोताला बांधलेल्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने एक बैल जागीच ठार झाला असून, दुसरा बैल बेशुध्द झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील आंगले - सौंदळकरवाडी येथे गुरूवारी सायंकाळी घडली. यावेळी प्रसंगावधान राखत विद्युत डीपी त्वरित बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
आंगले - सौंदळकरवाडी येथील शेतकरी श्रीधर सौंदळकर यांची शाळा क्रमांक २ येथे शेती आहे. गुरूवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे उखळ करण्यासाठी त्यांनी दोन जोते बांधली हाेती. यावेळी संदेश व दर्शन यांच्या पायाला झिणझिण्या आल्या. त्यावेळी लक्षात आले की, विद्युत प्रवाह सुरू आहे. त्यांनी त्वरित बैल सोडण्यास सांगितले. दरम्यान, दर्शन याने नजीक असलेली विद्युत डीपी धावत जाऊन बंद केली. मात्र, हे करण्यापूर्वी एक बैल जागीच मृत झाला तर दुसरा बैल बेशुध्द पडला होता. काही तासांपूर्वी घरातील महिलांनी तेथील रान काढून टाकले होते. मात्र, त्यावेळी त्यांना याची जाणीवही झाली नाही. जोत बांधताच विजेचा झटका बसण्यास सुरूवात झाली. शेतीमध्ये काम करण्यासाठी श्रीधर सौंदळकर यांच्या कुंटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही. मात्र, एक बैल ठार झाल्याने श्रीधर सौंदळकर यांचे २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.