उखडलेले रस्ते; पाणीटंचाई कायम
By admin | Published: November 17, 2014 09:53 PM2014-11-17T21:53:10+5:302014-11-17T23:26:24+5:30
नव्या सरकारकडून अपेक्षा : बेरोजगारी कमी करण्याची गरज; औद्योगिक वसाहतीकडे दुर्लक्ष--रेंगाळलेले प्रश्न
सुभाष कदम -चिपळूण -कोकणची सांस्कृतिक राजधानी व रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय केंद्र म्हणून ओळख असणारा चिपळूण तालुका आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील राज्यकर्त्यांनी विकासाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी शहरापासून गावापर्यंत कोठेही नजर टाकली तरी येथील रस्ते उखडलेले आहेत. तालुक्यात १८ गावांतील ४६ वाड्यांमध्ये आजही पाण्याची तीव्र टंचाई भासते. धनगरवाड्यांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते. हे वास्तव नाकारुन चालणार नाही.
चिपळूण तालुक्यात १६७ गावे आहेत. १३० ग्रामपंचायती कार्यरत आहेत. हा तालुका चिपळूण व गुहागर विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यात १८ पंचायत समिती सदस्य व ९ जिल्हा परिषद सदस्य कार्यरत आहेत. रस्त्यावरुन गावाची ओळख पटते. सर्वच गावातील रस्त्यांची आज दुरवस्था झाली आहे. शासनाकडून डागडुजीसाठी निधी नाही. जे नवीन रस्ते होतात ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ती कामे टिकत नाहीत. त्यामुळे रस्त्यांची अडथळ्यांची शर्यत कायम आहे.
उन्हाळ्यात चिपळूण तालुक्यात दरवर्षी अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भासते. अनेक नळपाणी योजना शोभेच्या ठरल्या आहेत. धनगरवाड्या आजही तहानलेल्या आहेत. गेल्या वर्षी १८ गावांतील ४६ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शासन कोट्यवधी रुपये नळपाणी योजनांवर खर्च करते. परंतु, नियोजनाचा अभाव व निकृष्ट कामामुळे योजनांचा बोजवारा उडतो. शासकीय अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याने लोक पाण्यापासून वंचित आहेत.
परशुराम मंदिर, गोवळकोट, कालुस्ते, मजरेकाशी येथील खाडीकिनारा, तुरंबव येथील शारदेचे मंदिर, तिवरे येथील गंगा, गोवळकोट येथील गोविंदगड, कुंभार्ली घाट, टेरव येथील भवानी मंदिर यासह अनेक सुंदर मंदिरे व पर्यटनस्थळे या तालुक्यात आहेत. येथे सुंदर बाजारपेठ आहे. शिवाय राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था असल्याने पर्यटक येथे वास्तव्य करणे पसंत करतात. परंतु, चांगले रस्ते व पर्यटनस्थळांची दुरवस्था असल्याने पर्यटक येथे यायला धजावत नाहीत. शासनाने या तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे.
बेरोजगारांची संख्या वाढत आहे. खेर्डी येथे जिल्ह्यातील पहिली औद्योगिक वसाहत उभारली आहे. परंतु, आज या ठिकाणी उद्योगांपेक्षा राहती घरेच वाढली आहेत. गाणेखडपोली येथेही औद्योगिक वसाहत आहे. या दोन्ही वसाहतींचे नूतनीकरण करून नवीन उद्योग येथे आल्यास बेरोजगारीवर मात करणे शक्य होईल. तालुक्यात कामथे उपजिल्हा रुग्णालय व ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल.
कचऱ्याचा प्रश्न कायम
चिपळूण शहरासह लगत असलेल्या गावांमध्ये रस्त्यालगत कचरा टाकला जातो. घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवून कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वायत्त संस्थांना शासनाने सहकार्य करायला हवे.
दूषित पाणी...
चिपळूण तालुक्यात आजही साथीचे आजार पसरतात. दूषित पाण्यामुळे रोगराई होते. वहाळ, दादर, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या अनेक गावात दूषित पाणी असते. आॅक्टोबरअखेर ३० गावांमधील पाणी दूषित असल्याचे आढळून आले.
उद्यानांची दुरवस्था...
चिपळूण शहरात एकही मोठे उद्यान किंवा क्रीडा संकुल नाही. शहरात असणाऱ्या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. जे क्रीडा संकुल आहेत तेथे सोयीसुविधांचा अभाव आहे. नगर परिषदेच्या शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हायला हवी.
गणेशोत्सवात तारांबळ
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी गावात घरोघरी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त दाखल होतात. याच काळात रस्त्यांवर अधिक खड्डे पडलेले असतात. पावसामुळे रस्त्यांवरील डांबर धुपून जाते व खडी वर येते. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. त्यामुळे खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने खड्डे बुजविणे अवघड होते.
तालुक्याचे विभाजन आवश्यक
तालुक्यात चिपळूण शहर, सावर्डे, शिरगाव येथे पोलीस ठाणे आहेत. पण, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी. खरवते, दहीवली येथील कृषी महाविद्यालयाजवळ क्रीडा संकुल होणार आहे. सावर्डे येथे बाजारपेठ वाढत असून, स्वतंत्र तालुका म्हणून सावर्डे परिसर अस्तित्वात येऊ शकतो. तालुक्याचे विभाजन केल्यास आता होणारा प्रशासकीय ताण कमी होईल व सावर्डे परिसरातील गावांचा झपाट्याने विकास होईल. त्यासाठी तालुका विभाजन होणे आवश्यक आहे.
कारखाने भकास...
औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांचे केवळ सांगाडे उभे आहेत. त्यांची यंत्रे गंजली आहे. काही कारखान्यांची पडझड झाली असून हे कारखाने बंद अवस्थेत आहेत. अनेक प्लॉट फक्त निवासी कारणासाठी वापरले जात आहेत.