बागायतदारांनो... जागते रहो...!

By admin | Published: April 24, 2016 12:35 AM2016-04-24T00:35:53+5:302016-04-24T00:35:53+5:30

पहारा कडक : कॅनिंग सुरु झाल्याने वाढली चोरीची भीती

The bureaucrats ... keep awake ...! | बागायतदारांनो... जागते रहो...!

बागायतदारांनो... जागते रहो...!

Next

रत्नागिरी : आंबा कमी असतानासुध्दा कॅनिंग सुरू झाल्याने शेतकरीबांधव चिंताग्रस्त झाला आहे. कॅनिंग सुरू झाल्यानंतर चोरीचे प्रकार वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील पहारा कडक केला आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्याने हंगामापूर्वी आलेला मोहोर टिकला. शेतकऱ्यांना १५ ते १६ वेळा फवारण्या कराव्या लागल्या. प्रतिबंधात्मक कीटकनाशकांमुळे तुडतुडा नष्ट होत नाही. तुडतुड्याच्या विष्ठेमुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत. डाग पडलेल्या आंब्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे निवडक आंब्याच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा किलोवर दिल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या रोखीने पैसे मिळतात.
ग्रामीण भागाबरोबर शहरातही कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ एप्रिलपासून कँनिग सुरू झाले आहे. ३० रुपये किलो दराने या आंब्याची खरेदी सुरू आहे. आंबा कमी असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्याने चोरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या बागेत जागता पहारा करत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या बागा भाडेकराराने घेऊन आंबा व्यवसाय करणारी मंडळी अधिक आहेत. प्रामुख्याने कलमबाग मालकांसोबत दोन ते तीन वर्षांसाठी करार करण्यात येतो. त्यामुळे ठरलेले पैसे मालक घेतो. याच दरम्यान झालेल्या नुकसानासाठी शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईदेखील शेतकरीच घेतो. मात्र, करार करणारा व्यापारी पीक मिळेपर्यंत खते, कीटकनाशके, मजुरी, काढणी, लाकडी पिंजरा, वाहतूक, हमाली, दलाली मिळून मार्केटला पाठवेपर्यंत प्रचंड खर्च करतो.
मार्केटमधील दर स्थिर असला तर खर्च निघतो. मात्र, नैसर्गिक दुष्टचक्राचा फटका पिकाला बसत असल्याने व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. यावर्षी आंबापीक मुळातच कमी आहे. तसेच मार्केटमध्ये अद्याप आंबा मुबलक स्वरूपात जाण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)
मागणी.. : रात्री अपरात्रीचा आंबा घेऊच नये
कॅनिंग व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चोरी वाढत असल्यामुळे कलमबागांचे मालक किंवा कराराने बागा घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडूनच आंबा कॅनिंग विके्रत्यांनी विकत घ्यावा. चोरीचा किंवा रात्री-अपरात्री आंबा विक्रीस आणणाऱ्यांचा आंबा विकत घेऊ नये, जेणेकरून या चोरीला आळा बसेल. वास्तविक आंबापीक येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे या व्यवसायावर कोठेतरी नियंत्रण येणे गरजेचे आहे.
-एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी.

Web Title: The bureaucrats ... keep awake ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.