‘विराट’ श्वानाच्या मदतीने अवघ्या ३६ तासात घरफोडी उघड
By अरुण आडिवरेकर | Published: November 26, 2022 04:46 PM2022-11-26T16:46:25+5:302022-11-26T16:47:04+5:30
रत्नागिरी : बंद घर असल्याचा फायदा उठवत चोरट्याने १ लाख ७५ हजार किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना कळंबट (ता. ...
रत्नागिरी : बंद घर असल्याचा फायदा उठवत चोरट्याने १ लाख ७५ हजार किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना कळंबट (ता. चिपळूण) येथे घडली होती. या घरफोडीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी ‘विराट’ या श्वानाची मदत घेतली. घटनास्थळी सापडलेल्या पर्सच्या वासावरुन या श्वानाने १५० मीटर अंतरावर असलेल्या गावातील एका संशयिताला पकडून दिले.
याबाबतची फिर्याद सुवर्णा कृष्णा गावडे (४५, रा. कळंबट-फणसवाडी, चिपळूण) यांनी दिली होती. सुवर्णा गावडे यांचे राहते घर १९ नोव्हेंबर सकाळी ११ ते २३ नोव्हेंबर सकाळी ९ या कालावधीत बंद होते. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने घरावरील कौले काढून घरात प्रवेश केला होता. अन् तब्बल १ लाख ७५ हजार किमतीचा ऐवज चोरून नेला.
रत्नागिरीपोलिस दलाच्या श्वान पथकातील ‘विराट’ला तपासासाठी घटनास्थळी आणले. त्याठिकाणी मिळालेल्या पर्सचा वास श्वानाला देण्यात आला. या पर्सचा वास घेताच श्वान सुमारे १५० मीटरच्या अंतरावर असलेल्या गावातील वाडीत पोहोचला. या वाडीतीलच एका घराजवळ हा श्वान येऊन थांबला आणि भुंकू लागला. श्वानाच्या इशाऱ्यानंतर तपास पथक घरात चौकशीसाठी शिरले. पोलिस तपासात घरातील व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला सावर्डे पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, सावर्डेचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीपक साळोखे, श्वान पथक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक चित्रा मढवी, सावर्डेच्या पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर, सहायक पोलिस फौजदार प्रदीप गमरे, हवालदार राजेंद्र आरवट, श्वान पथकातील चालक संभाजी घुगरे, श्वान हस्तक महेश हरचिरकर, संदेश कोतवडेकर यांच्यासह सावर्डे पोलिस स्थानकाच्या कर्मचारी यांनी या चोरीचा छडा लावण्याची कामगिरी बजावली.