बस पूर्ववत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:54+5:302021-08-26T04:33:54+5:30
मंडणगड : लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्याला जाण्यासाठी तालुक्यातून सुरू असणारी वेळास-रत्नागिरी एकमेव एस.टी. बस बंद असल्याने तालुकावासीयांची गैरसाेय होत आहे. यामुळे ...
मंडणगड : लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्याला जाण्यासाठी तालुक्यातून सुरू असणारी वेळास-रत्नागिरी एकमेव एस.टी. बस बंद असल्याने तालुकावासीयांची गैरसाेय होत आहे. यामुळे ती पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ही गाडी सर्वांसाठी सोयीची व अत्यावश्यक आहे.
रानभाज्या महोत्सव
दापोली : तालुक्यातील गिम्हवणे-दुबळेवाडी येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रानभाज्यांपासून केक, पराठे, कटलेट, खीर, सूप, थालीपीठ, भजी, पानमोडे, हलवा, रसमलाई, रोल, ज्यूस, लोणचे, इडली, अप्पे आदी नावीन्यपूर्ण प्रकार तयार करून पाककृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. परीक्षण राधिका मोहोड, डाॅ. पूजा सावंत यांनी केले.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खेड : अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचतर्फे तालुक्यातील पूरग्रस्त भागातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेल्डी, कासई, खोपी येथील बाधितांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे, रूपेश गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक बांधीलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता.
ट्रेकर्सतर्फे महाअभिषेक
खेड : स्वराज्य ट्रेकर्सतर्फे दि. २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील चक्रदेव मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वाहनांची रॅली निघणार आहे. वेरळफाटा, खोपी-रघुवीर घाटमार्गे चक्रदेव मंदिरात रॅली पोहोचणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी ऋषीकेश कानडे, सिद्धेश पाटणे, नंदू साळवी, सिद्धेश साळवी, प्रसाद शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालिदास पुरस्कार
रत्नागिरी : राज्य सरकारने महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार २०२० ची घोषणा केली आहे. यामध्ये संस्कृत शिक्षक व इतर श्रेणीत चिपळूणच्या डाॅ. माधवी जोशी व प्राध्यापक गटात डाॅ. कल्पना आठल्ये यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने २०१८, २०१९, २०२० या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दोन महिलांची वर्णी लागली आहे.