बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास
By admin | Published: March 2, 2015 10:10 PM2015-03-02T22:10:44+5:302015-03-03T00:26:03+5:30
चिपळूण एस. टी. आगार : प्रवाशांची गैरसोय झाली दूर--लोकमतचा प्रभाव
चिपळूण : शहरातील जुन्या बसस्थानक आवारात खासगी गाड्या उभ्या राहात असल्याने मुख्य बससथानकातून सुटणाऱ्या एस. टी. बस स्थानकात आणण्यास चालकांना त्रासदायक ठरत होते. ही बाब ‘लोकमत’ने संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेऊन या स्थानकात आज (सोमवार)पासून बी. के. भिंगारे यांची वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी गाड्या उभ्या करण्यास निर्बंध करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईनजीक हे जुने बसस्थानक आहे. मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या व गुहागर मार्गावर जाणाऱ्या एस. टी. बसेस या स्थानकात आल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असतात. मात्र, हे बसस्थानक खासगी गाड्यांचे वाहनतळ बनले आहे की काय, असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध आले. याची दखल घेऊन आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांनी या आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून भिंगारे यांची नियुक्ती केली आहे. गुहागर मार्गावर जाणाऱ्या सर्व एस. टी. गाड्यांची नोंद येथे केली जाते. हे बससथानक असूनही येथे खासगी गाड्या तासन्तास उभ्या राहतात. त्यामुळे बसस्थानकात एस. टी. आणण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातून बस वळवली जात असे. त्यामुळे स्थानकात असणाऱ्या प्रवाशांची एस. टी. बस पकडण्यासाठी धावपळ होत असे. काही प्रवासी शेजारी असणाऱ्या दुकानासमोरच उभे राहात असत. याची दखल घेऊन बसस्थानकात वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात आला असल्याने उभ्या राहणाऱ्या खासगी गाड्यांना आता चाप बसला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)