रत्नागिरी जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये चोऱ्या करणारी टोळी गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:33 PM2018-12-10T14:33:34+5:302018-12-10T14:35:27+5:30
गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली.
रत्नागिरी : गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली.
या ६ चोरट्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ वाहनासह ५ लाख ५० हजार ४५१ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गेल्या सहा महिन्यांच्या काळात एस. टी. स्थानकांवर चोºयांचे प्रकार वाढल्याने त्याचा छडा लावण्याचा निर्धार जिल्हा पोलिसांनी केला होता. त्यानुसार तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक तयार केले.
पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस कर्मचाºयांचे एक खास पथक तयार कले.
या पथकाने दापोली, खेड, चिपळूण व देवरुख पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा आढावा घेऊन सीसीटीव्ही फुटेजचा व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला.
फुटेजमधील संशयितांबाबत माहिती मिळवली असता ते वेळोवेळी रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर या ठिकाणी वावरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन सदर पथकातील कर्मचारी यांची विभागणी करून त्यांना रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पाठविले होते.
८ डिसेंबर २०१८ रोजी काही संशयित (फुटेजच्या वर्णनातील) खेड परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्यावरुन खेड परिसरातील एस. टी. स्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, भरणेनाका या ठिकाणी शोध घेतला असता भरणेनाका या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना स्कॉर्पिओ गाडी (एमएच - १६ - एटी ५११७) थांबविण्यात आली.
त्यामध्ये सीसीटीव्ही फूटेजमधील चोरटे आढळून आले. त्यांनी दापोली, खेड व चिपळूण एस. टी. स्टॅण्ड या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना ८ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींंमध्ये सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (३८), ज्ञानदेव प्रभाकर बडे (३८), गणेश उर्फ संदीप दिनकर झिंझुर्डे (२६), आजीनाथ भगावन पवार (३२), नागेश बारकू पवार (२६), जगन्नाथ मुरलीधर वाघ (५०, सर्व रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.
या चोरट्यांच्या अटकेमुळे दापोली पोलीस स्थानकाअंतर्गत ३, चिपळूण पोलीस स्थानकातील २, तर खेड पोलीस स्थानकातील २ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून स्कॉर्पिओ गाडीसह एकूण ५,५०,४५१ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी सध्या चिपळूणमधील गुन्ह्यांच्या प्रकरणात अटक असून, त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, राकेश बागुल, पोलीस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, सत्यजित दरेकर, चालक दत्ता कांबळे, रमीज शेख, दिनेश आखाडे, संदीप कोळंबेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाºयांचा सहभाग होता.