रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 PM2020-09-19T17:00:25+5:302020-09-19T17:01:44+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.
कोरोनामुळे दिनांक २२ मार्चपासून एस्. टी.ची वाहतूक ठप्प होती. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २० ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्केप्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याला राज्य परिवहन महामंडळाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.
कर्नाटक व गुजरात राज्यांनी शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. एस्. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे.
वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बस या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्यात याव्यात, लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या झेड पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, यापुढे पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने सर्व आसने पूर्ववत करण्याची सूचना देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातर्फे रविवार, २० सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील शहरी वाहतूक दिनांक २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत शहरी वाहतूक बंद होती. आता शहरी वाहतूक सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.