Video: ... पण प्रत्यक्षात हे 'पवार सरकार', शिवसेना खासदाराचाच महाविकास आघाडीवर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:26 AM2022-03-21T11:26:22+5:302022-03-21T12:31:54+5:30
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती
रत्नागिरी/दापोली : केवळ “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना खासदारानेच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभात खा. किर्तीकर बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नगरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही आता महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने या आघाडीत सर्वच आलबेल नाही, असे दिसून येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना, त्यानंतर कॉग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ १६ टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना मिळाल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
दरम्यान, या कार्यक्रमात खा. किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम यांचा सत्कारही करण्यात आला. ते म्हणाले कि अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो, हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र इकडे जास्त आहे, असे म्हणत तुला ते भोगायला लागत आहे, असे त्यांनी आ. योगेश कदम यांना सांगितले व आपण तुझ्या पाठीशी आहोत, असा धीरही त्यांनी आमदार योगेश कदम यांना दिला.
आ. योगेश कदमांना पक्षांतर्गत विरोध
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र आ. योगेश कदम यांना कॉर्नेर करण्याचा प्रयत्न केला जात असून दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आ. योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते. तसेच योगेश कदम यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे आ. योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे.