आंबा बागायतदारांना दिलासा, निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:24 PM2022-03-05T13:24:56+5:302022-03-05T13:25:43+5:30
आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात.
रत्नागिरी : देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोहोचवण्याबरोबरच विविध देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. रत्नागिरीमध्येचआंबा खरेदी करण्याची तयारी या कंपनीने दाखवली असल्याने आंबा बागायतदारांचा निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार आहे.
आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात. त्याला किती दर मिळेल, किती दर मिळाला, नेमका किती आंबा परदेशात गेला, याची माहिती बागायतदारांना मिळत नाही. यात त्यांचे नुकसान होते. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीचा आंबा खरेदी केला जाणे, ही बागायदारांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.
या कंपनीच्या प्रतिनिधीने स्थानिक बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी आता इच्छुक विक्रेत्यांची नावनोंदणी होणार आहे. वाशी, अहमदाबाद, पुणे, सुरत अशा बाजारपेठांमध्ये असलेल्या दराप्रमाणे रत्नागिरीतील केंद्रांवर हापूस खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने जागेवरच आंबा खरेदी करून रोखीत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक १० मार्चपासून रत्नागिरीत ही खरेदी सुरु होईल.
आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. मात्र, कमी पेट्या असतील तर बागायतदाराला केंद्रापर्यंत आणून द्याव्या लागणार आहेत. दर्जाप्रमाणे दर आणि जागेवरच पैसे मिळणार आहेत.
डागाळलेला आंबा
डाग पडलेला आंबा दलालांकडून फेकून दिला जातो. त्याची विक्री होत नसल्याने तो दलालांकडे पाठवलाच जात नाही. अशा मालाबाबत बागायतदार राजेंद्र कदम यांनी प्रश्न केला असता, कंपनीने तोही आंबा किलोच्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.
खर्च वाचेल
आंब्याची जागेवरच खरेदी केली गेली तर आंबापेटी आणि वाहतूक हे बागायदारांचे दोन मोठे खर्च वाचतील. त्यामुळे बागायतदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. हे दोन खर्च सोसून वाशीला पाठवलेल्या आंब्याला दर किती मिळेल, याची खात्री नसल्याने बागायदार या नव्या पर्याबाबत अधिक सकारात्मक आहेत.
आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी खरेदी करणार आहे. बागायतदारांचे नुकसान होणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. - दीपक बन्सल, प्रतिनिधी
वाशी मार्केटप्रमाणे जागेवर दर देण्यात आला तर वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. तसेच कंपनीला पाहिजे त्या वर्गवारीचा आंबा देण्यात येणार आहे. मात्र कंपनीने दरात फरक करुन बागायतदारांचे नुकसान टाळावे - राजन कदम, आंबा बागायतदार