जमिनीच्या मोजणीसाठी केबिन विनामोबदला रंगवून घेतली, राजापूर भूमी अभिलेखचा अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:39 PM2024-03-13T12:39:54+5:302024-03-13T12:41:31+5:30
राजापूर : वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून घेणाऱ्या राजापूर येथील ...
राजापूर : वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून घेणाऱ्या राजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक सुशील रामदास पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी अटक केले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार भूमी अभिलेख उपअधीक्षक सुशील रामदास पवार याने तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून देण्याची मागणी केली होती. दि. १ व ६ मार्च २०२४ रोजी मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने दि. ८ व १० मार्च या कालावधीत त्यांच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून दिले.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सुशील पवार याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, हवालदार विशाल नलावडे, हुंबरे, नाईक दीपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांचा पथकात सहभाग होता. सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी काम पाहिले.