विवली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:16 PM2020-12-17T18:16:06+5:302020-12-17T18:16:59+5:30
leopard, Ratnagirinews लांजा तालुक्यातील विवली -बौध्दवाडी येथील रवींद्र मानिक कांबळे यांच्या वासरावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे.
लांजा : तालुक्यातील विवली -बौध्दवाडी येथील रवींद्र मानिक कांबळे यांच्या वासरावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे. दरम्यान, या परिसरातील बिबट्याच्या संचारामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
विवली - बौध्दवाडी येथील रवींद्र कांबळे यांनी आपले दीड वर्षांचे वासरु मंगळवारी सकाळी ११ वाजता घराशेजारीच चरण्यासाठी सोडले होते. यावेळी अचानक बिबट्याने या वासरावर हल्ला केला. यावेळी वासराच्या हंबरण्याचा आवाज आल्याने कांबळे यांच्या शेजाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता, बिबट्याने तेथून धूम ठोकली.
या हल्ल्यामध्ये वासराच्या मानेवर बिबट्याची नखे लागल्याने वासरु जखमी झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी वासरावर उपचार केले असून, रोहित रवींद्र कांबळे यांनी लांजा वन विभागाला या घटनेची माहिती दिली आहे.
सध्या शेतकरी जनावरांना लागणारे गवत काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. दिवसा रानामध्ये जावून हे गवत काढले जाते. त्यातच मंगळवारी दिवसाढवळ्या बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने येथील ग्रामस्थ आात एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी विवलीतील ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.