महिला खातेदारांसाठी मोहीम
By admin | Published: August 1, 2016 12:28 AM2016-08-01T00:28:28+5:302016-08-01T00:28:28+5:30
सक्षमीकरणाचे प्रयत्न : ग्रामसभेत मिळणार सर्व माहिती
श्रीकांत चाळके ल्ल खेड
दिनांक १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महसूल आठवडा राबविणे आणि महिला खातेदारांसाठी गावपातळीवर ग्रामसभा घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या ग्रामसभेमध्ये शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या योजनांची महिलांना माहिती देण्यात येणार आहे. यावेळी विविध योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे तसेच महिला खातेदारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचे त्याचठिकाणी निराकरण करणे व महिला खातेदारांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
याबाबत संबंधित मंडल अधिकारी, तलाठी, संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायतींना कळविणेत आले असून, शासनाच्या या महाराजस्व अभियानामध्ये आता अधिकारीदेखील झोकून काम करणार असल्याचे खेडचे तहसीलदार अमोल कदम व नायब तहसीलदार मंगेश आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत तालुका पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे.
या महाराजस्व अभियानासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार सर्व तहसीलदारांसह खातेप्रमुखांनाही यासंबंधी आदेश पारीत करण्यात आले आहेत़ प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी विशेष ग्रामसभा या काळात घेण्यात येणार असून, मंडल अधिकारी, तलाठी व संबंधित अधिकारी हे ग्रामसभेमध्ये जावून महिलांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रश्न यांची सोडवणूक करणार आहेत.
महिलांच्या नावे कुटुंबप्रमुख म्हणून रेशनकार्डावर नोंद करणे, मालमत्तेवर महिलांची नोंद करणे, गावातील महिलांचे सार्वजनिक स्वरूपातील प्रश्न, अभिलेखातील वारस नोंदीतील महिलांच्या असलेल्या अडचणी तत्काळ सोडविणे, दारिद्र्यरेषेखालील घटस्फोटीत व परित्यक्त्या महिलांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देणे, यासह अन्य विविध योजनांची माहिती महिलांना या ग्रामसभेमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना प्रथमच त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची एकाच व्यासपीठावर माहिती मिळणार आहे.
जागृतीसाठी प्रयत्न : विविध योजनांचा नारा ग्रामीण भागापर्यंत
शासनामार्फत महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातील महिलांपर्यंत यातील अनेक योजना पोहोचतच नाहीत. त्यामुळे या योजनांच्या लाभांपासून महिला वंचित राहतात. याबाबत आता शासनाने महिलांमध्ये जागृती करण्याचा निर्णय धेतला आहे. गावातील सर्वच महिलांना ग्रामसभा घेऊन या योजनांची माहिती देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जागृती सुरु होणार आहे.
४आठवडाभर होणार समुपदेशन.
४आज साजरा होणार महसूल दिन.
४शासनाच्या महाराजस्व अभियानात अधिकारी लागले कामाला.
४योजनांची मिळणार माहिती...