परिसर कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:56+5:302021-05-08T04:32:56+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात कोरोनाचे रुग्ण सापडू लागताच ग्रामपंचायतीने सतर्क होऊन लॉकडाऊनच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास ...
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात कोरोनाचे रुग्ण सापडू लागताच ग्रामपंचायतीने सतर्क होऊन लॉकडाऊनच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायत कृती दल, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या विशेष बैठकीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि तो यशस्वीही करून दाखविला.
पाणी योजनेसाठी १५ कोटी
रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत २८ गावांसाठी असलेल्या जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत जॅकवेल जलशुद्धीकरण प्रकल्प, पाणी साठवण टाक्या उभारण्याची कामे सुरू केली आहेत. या योजनेंतर्गत कळझोंडी धरणाची उंची वाढविण्यासाठी सुमारे १५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
युवकांत उत्सुकता
लांजा : तालुक्यात सध्या अठरा ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास प्रारंभ झाला आहे. लस घेण्याबाबत युवकांमध्ये काहीशी भीती असली तरीही मोठ्या प्रमाणावर उत्सुकताही आहे. त्यामुळे नोंदणी उत्साहाने केली जात आहे.
पाणी योजना दुरुस्ती
पाली : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी राजापूर मतदार संघातील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने २ कोटी ८ लाख रुपयांचा, तर लांजा तालुक्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सर्वेक्षणाला प्रतिसाद
रत्नागिरी : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या विशेष मोहिमेतून जिल्ह्यातील गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजन स्तर यातून तपासला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची तसेच गंभीर आजारी असलेल्यांची संख्या पुढे येत आहे.
पाण्याचे दुर्भीक्ष्य
आवाशी : खेड तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावांना सध्या पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. या तालुक्यातील केळणे येथील भोसलेवाडी आणि मांगलेवाडी या दोन वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाकडून सध्या ११ गावे आणि २१ वाड्यांना एक शासकीय आणि तीन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
कोरोनामुक्तीकडे वाटचाल
मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मात्र मंडणगड तालुक्याने कोरोना रुग्णांची संख्या घटविण्यात यश मिळविले आहे. तालुक्याचा आरोग्य विभाग अधिक सतर्कतेने आणि कार्यक्षमतेने काम करीत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ लागली आहे.
पाण्याचा प्रश्न गंभीर
चिपळूण : कोरोना काळात सामान्य रुग्णांसाठी आधार असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १३० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु या रुग्णालयाला सध्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सतावत आहे. पाणीटंचाई असल्याने रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचेही प्रचंड हाल होत आहेत.