चिपळूण नगर परिषदेचे ठराव रद्द करा : इनायत मुकादम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:07+5:302021-05-30T04:25:07+5:30
चिपळूण : नगर परिषदेच्या १२ एप्रिलच्या मुख्य सभेत केलेले ठराव बेकायदेशीर आहेत. ते रद्द करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक ...
चिपळूण : नगर परिषदेच्या १२ एप्रिलच्या मुख्य सभेत केलेले ठराव बेकायदेशीर आहेत. ते रद्द करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या सभेत वादग्रस्त कामांना मुदतवाढ देणे, अपूर्ण कामे पूर्ण करून नियमित करणे, या कामांची देयके अदा करणे असे ठराव करण्यात आले आहेत. मात्र, ही कामे प्रचंड वाढीव दराची असून, या कामांमध्ये आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ज्या कामांसाठी हा ठराव करण्यात आला आहे, त्या कामांची मी यापूर्वीच आपल्याकडे तक्रार केली आहे. त्याचा निकाल लागलेला नाही. नगरसेवक राजेश केळसकर व अन्य नगरसेवकांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. याचबरोबर काही ठेकेदारांनीही आपल्याकडे नगर परिषदेविरोधात अपील दाखल केले असून, त्याचाही निकाल लागलेला नाही. त्यामुळे हे ठराव करून प्रशासन, लोकप्रतिनिधी या चुकीच्या कामांना कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामुळे नगर परिषदेचे करोडो रूपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आपण हे ठराव रद्द करावेत, नगर परिषदेकडून वस्तूस्थितीदर्शक अहवाल तातडीने प्राप्त करून घ्यावा, सर्व तक्रारींचा निकाल लागेपर्यंत पुढील कार्यवाही न करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.