उधना-मंगळूर साप्ताहिकच्या १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द, रेल्वे प्रशासनाने दिले नाही कारण
By अरुण आडिवरेकर | Published: July 14, 2023 05:11 PM2023-07-14T17:11:31+5:302023-07-14T17:12:54+5:30
उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसादामुळे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे ३० ऑगस्टपर्यंत या गाडीला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, १९ जुलैपासून ३० ऑगस्टपर्यंत धावणाऱ्या उर्वरित फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ०९०५७/०९०५८ क्रमांकाच्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला २८ जूनपासून ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. वसईमार्गे धावणाऱ्या २२ एलएलबी डब्यांच्या स्पेशल गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव स्थानकात थांबे देण्यात आले होते.
मात्र, १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. फेऱ्या रद्द करण्यामागचे नेमके कारण रेल्वे प्रशासनाने दिलेले नाही.