रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल
By अरुण आडिवरेकर | Published: June 22, 2023 06:52 PM2023-06-22T18:52:40+5:302023-06-22T18:52:53+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड ...
रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील उमेदवाराने हा प्रताप केला असून, त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. बनावट दस्ताऐवज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मराज राम दुधाळ (२६, रा. पाथर्डीनगर, हिवरसिंगा ता. शिरूर, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तत्कालीन रत्नागिरी जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्य शासनाकडून पोलिस शिपाई भरती २०२१ घेण्याच्या सूचना सर्व जिल्हा पोलिसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून पोलिस शिपाई भरती घेण्यात आली.
धर्मराज दुपाल यांची इतर मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणामध्ये निवड करण्यात आली होती. त्यासंबंधी दुधाळ याने आपण प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. बीड जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे सांगितले.
प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होताच दुधाळ याची प्राथमिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी आपण बनावट प्रमाणपत्र तयार केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी दुधाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.